झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सुशांत आणि अंकिता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील जवळीकीमुळेही चर्चेचा विषय ठरले. सुशांतने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्याचे ठरविले आणि ‘कायपोचे’ या पहिल्याच चित्रपटाने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या दोघांच्या कारकिर्दीचा प्रवास यशस्विपणे सुरू असून, काही महिन्यांतच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अलिकडेच सुशांत आणि अंकिताने त्यांच्या मालाड येथील नवीन घरात प्रवेश केला.
११ नोव्हेंबर रोजी आम्ही नवीन घरात प्रवेश केला. आमच्या जुन्या घरापेक्षा हे घर अधिक प्रशस्त असून, खास बाब म्हणजे या घरात माझी स्वत:ची ‘होम थिएटर रूम’ आहे. येत्या काही महिन्यात आम्ही विवाहबद्ध होणार आहोत. गेल्या चार वर्षांपासून आम्ही ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहात आहोत. या नातेसंबंधांना आणखी पुढे नेत आम्ही विवाहबद्ध होण्याचा विचार केला आहे. जी एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सुशांत म्हणाला.
अंकिता आपल्या एवढी महत्त्वाकांक्षी नसल्याचे सांगत सुशांत म्हणाला, दूरदर्शनवरील तिची कारकीर्द चांगली सुरू असून, काही मोठ्या चित्रपटांच्या संधी देखील तिच्याकडे चालून आल्या होत्या. परंतु, काही कारणांनी त्या फलद्रुप झाल्या नाहीत. अकिंता तिच्या विश्वात आनंदी असून, तिच्याप्रमाणेच मला देखील माझ्या वाटचालीत सुरक्षा आणि आनंद हवा आहे.
अंकिताने चारचौघांमध्ये त्याला मारल्याच्या बातमीबाबत सुशांतला विचारले असता तो म्हणाला, तुम्ही जे वाचता त्यावर विश्वास ठेवता की जे पाहता त्यावर? माझ्याबाबतचे केवळ हेच एक निराधार वृत्त नसून, जीममध्ये माझे एकाशी भांडण झाल्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. प्रारंभी अशा वृत्तांचा मला त्रास व्हायचा. अशा टीकांचा माझ्यावर परिणाम होणार नाही, याची मी आता खबरदारी घेतो. आयुष्यातील अशाप्रकारच्या अडचणींवर मी जीवनातील आणि कामातील चांगल्या गोष्टींचा विचार करून मात करतो. हेच जीवन आहे. तुम्हाला जर गुलाबांचा बगीचा हवा असेल, तर तो काट्यांनी भरलेला असतो हे विसरून चालणार नाही. अंकिताने मला मारले नाही, हे मला माहीत आहे. पण व्हायचे ते नुकसान झाल्यावर स्पष्टीकरण देऊन काय फायदा आहे? चित्रपटाच्या यशाचे सर्व श्रेय फक्त तुम्हालाच मिळण्याच्या घटनेची ही एक उणीवाची बाजू आहे, जेव्हा तुम्हाला माहिती असते की यात अनेकांचा वाटा आहे.

Story img Loader