मराठी-हिंदी मालिकांमधील काही काही व्यक्तिरेखा प्रंचड लोकप्रिय ठरतात. हिंदीमध्ये यापूर्वी ‘सास भी कभी बहूँ थी’ या मालिकेतील व्यक्तिरेखा सुपरडूपर हिट झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील अंकिता लोखंडे, सविता प्रभुणे, सुशांत सिंग राजपूत यांच्या व्यक्तिरेखांनाही घरोघर स्थान मिळाले होते. बराच काळ झी टीव्हीचा टीआरपी कायम राखणाऱ्या या मालिकेचा अखेरचा भाग ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात दाखविण्यात येणार आहे. अखेर ही मालिका पाच वर्षांनंतर संपत आहे हे जाहीर करण्यासाठी आणि प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकेतील मूळ जोडी पुन्हा दाखवून मालिका संपविण्याची कल्पना वाहिनीला सुचली. म्हणूनच या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेली आणि नंतर विवाहबद्ध झालेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत ही जोडी अखेरच्या भागात प्रेक्षकांना दर्शन देणार आहे.
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिता-सुशांत यांची छोटय़ा पडद्याबरोबरच वास्तवातही जोडी बनली. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतला मोठय़ा पडद्यावर ‘काय पो छे’ या चित्रपटातून चांगली संधी मिळाली. त्यानंतर टीव्ही मालिकेकडे वळण्याची गरज त्याला भासली नाही. परंतु, ज्या मालिकेने आपल्याला रातोरात ‘स्टार’ बनविले ती मालिका संपत असताना पुन्ही टीव्ही प्रेक्षकांसमोर अवतरण्याची सुशांतने तयार दाखवली. तीन वर्षांपूर्वी सिनेमातील करिअरसाठी मालिका सोडली असली तरी अखेरच्या भागाच्या चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलो तेव्हा या मालिकेतील भूमिकेने मला जसे प्रेक्षकांचे प्रेम दिले तसेच मोठय़ा पडद्याची दारेही खुली केली. आमच्या मालिकेच्या टीमला तीन वर्षांनंतर भेटल्याचा आनंद अवर्णनीय ठरला, असे सुशांत सिंग राजपूतने सांगितले.

Story img Loader