१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करणाऱ्या सुशांतच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या या प्रकरणी पोलीस तपास करत असून आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार, सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याचा मित्र सिद्धार्थ पिथानी त्याच्यासोबत होता असं सांगण्यात येत आहे.
सिद्धार्थ पिथानी हा सुशांतचा जवळचा मित्र असून त्याचा क्रिएटिव्ह कंटेंन्ट मॅनेजरदेखील होता. १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी सिद्धार्थ सुशांतच्या घरीच होता. सिद्धार्थने पोलीस चौकशीदरम्यान ही बाब सांगितल्याचं ‘न्यूज 18’ने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काहींच्या मते ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सुशांतच्या चाहत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.