भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत धोनीची मुख्य भूमिका साकारणार असून, ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी सुशांत कमालीचा उत्सुक आहे. नीरज पांडेचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट कॅप्टन कूलच्या म्हणजेच महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि इन्स्पायर्ड एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बनत असलेला ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट २२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असल्याचे सुशांतने टि्वट केले. सुशांत गेले चार महिने या चित्रपटासाठी कमालीची मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी फॉक्स स्टार स्टुडिओने रिती ग्रुपच्या इन्स्पायर्ड एन्टरटेन्मेंटबरोबर हातमिळवणी केली आहे. रांची येथून क्रिकेटमधील आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून बघता बघता आकाशाला गवसणी घालणाऱ्या धोनीचा क्रिकेटमधील प्रवास अविश्वसनिय असाच आहे. लाखो युवकांचा तो आदर्श आहे. ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात त्याच्या या चढत्या आलेखाच्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे कॅप्टन कूलची वैयक्तिक बाजू उलघडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पांडेने केला आहे. चित्रपटात विनोद, रोमान्स, जिंकणे आणि हारण्यातील थरार आणि भावनांचा चढ उतार इत्यादी पाहायला मिळणार आहे.

Story img Loader