चुंबनदृश्य हा बॉलीवूड चित्रपटांचा अविभाज्य आणि न टाळता येण्याजोगा भाग बनला आहे असे म्हणायला हरकत नाही; किंबहुना हिरो-हिरॉइनचे चुंबनदृश्य नसेल असा सिनेमा बनूच शकत नाही असेही काही जणांना वाटू शकते. ‘सीरियल किसर’ या प्रतिमेतून इम्रान हाश्मी बाहेर येऊन एक अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. आता त्याची जागा सुशांत सिंग राजपूतने घेतली आहे जणू. आगामी ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि स्वस्तिका चौधरी यांचे चुंबनदृश्य हे बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावरचे सर्वात ‘प्रदीर्घ’ असे चुंबनदृश्य असेल अशी चर्चा केली जात आहे.
त्याचे झाले असे की, चित्रपटाच्या सेटवर येऊन स्वस्तिका चौधरी हिने डिटेक्टिव्ह ब्योमकेशच्या प्रमुख भूमिकेतील सुशांत सिंग राजपूतचे एकाएकी प्रदीर्घ चुंबन घेतले म्हणे. सुशांतला म्हणे हा धक्का होता, कारण असे काही चित्रण केले जाणार आहे याची म्हणे त्याला कल्पना देण्यात आली नव्हती. चुंबनदृश्यात दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीला म्हणे चुंबन करतानाचे नैसर्गिक हावभाव अपेक्षित असल्यामुळे अचानकपणे स्वस्तिका चौधरीने सेटवर जाऊन सुशांत सिंग राजपूतचे चुंबन घेतले आणि ते चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे म्हणे आतापर्यंतच्या बॉलीवूड चित्रपटांतील सर्वाधिक प्रदीर्घ चुंबनदृश्य असेल अशीही चर्चा आता रंगली आहे.
चुंबनदृश्यांचा ‘भरपूर’ अनुभव सुशांत सिंग राजपूतने ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटात घेतला आहे हे प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच इम्रान हाश्मीनंतरचा ‘किसिंग स्टार’ अशी सुशांत सिंग राजपूतची प्रतिमा न झाली तरच नवल. ते काहीही असले तरी ब्योमकेश बक्षीच्या कथानकांचा काळ जुना असल्यामुळे चित्रपटाला आजचा युवा प्रेक्षक मिळावा म्हणून तर ‘चुंबनदृश्या’ची योजना दिग्दर्शक-निर्मात्यांनी केली नसेल ना अशी चर्चाही बॉलीवूडमध्ये केली जात आहे. स्वस्तिका चौधरी ही बंगाली चित्रपटांची अभिनेत्री या चित्रपटाद्वारे प्रथमच हिंदीच्या रुपेरी पडद्यावर झळकणार असून त्यामुळे तिला लोकप्रिय करण्यासाठीही अशा प्रकारचे चुंबनदृश्य चित्रित करण्यात आले असावे. शेवटी हिंदी सिनेमावाले चित्रपट बॉक्स ऑफिस हिट व्हावा यासाठी कोणत्याही थराला जाऊ  शकतात याचाच हा नमुना म्हणता येईल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा