सुषमा शिरोमणी हे नाव घेतले की ‘भिंगरी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारिंगी’ असे चित्रपट डोळ्यासमोर येतात. मराठी चित्रपटांमध्ये हिंदी गाणी वाजवायची आणि रेखा, जितेंद्र अशा हिंदीतील नावाजलेल्या कलाकारांना या गाण्यांवर नाचायला लावणाऱ्या सुषमा शिरोमणींनी अभिनय, चित्रपटनिर्मिती, कथालेखन अशा सगळ्याच क्षेत्रात काम केलेले आहे. अनेक वर्ष ‘इम्पा’ या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेत कार्यरत असणाऱ्या सुषमा शिरोमणींनी पुन्हा एकदा चित्रपटक्षेत्रात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतची चित्रपटनिर्मिती संस्था सुरू करायचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत पहिल्यांदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
‘मराठीत ‘भन्नाट भानू’ हा चित्रपट केल्यानंतर मी काम थांबवले होते. त्यानंतर मी मिथुन चक्रवर्ती, धर्मेद्र, नीलम, मीनाक्षी शेषाद्री अशा मोठमोठय़ा कलाकारांना घेऊन ‘प्यार का कर्ज’ हा चित्रपट काढला. मग कानून चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यावेळी इम्पा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेशी माझा संबंध आला. त्यावेळी आपल्या क्षेत्रातील लोकांसाठी कोणीच काम करत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर ‘इम्पा’ या संघटनेच्या माध्यमातून मी कार्यरत झाले. त्यामुळे बरीच वर्ष चित्रपट निर्मिती, अभिनय यापासून माझी फारकत झाली होती’, असे सुषमा शिरोमणींनी सांगितले. ‘लोक अजूनही मध्ये मध्ये मला चित्रपटनिर्मिती विषयी विचारणा करत होते. मग मी खरोखर विचार केला आणि स्वतची एक निर्मितीसंस्था उभारून त्याअंतर्गत, मराठी चित्रपट, विविध भाषिक चित्रपट आणि मालिका काढायचे ठरवले’, अशी माहिती त्यांनी दिली.
‘शिरोमणी चित्र’ या बॅनरखाली लवकरच त्या एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाची कथा लिहून तयार झाली असून दिग्दर्शनही त्या स्वतच करणार आहेत. येत्या महिन्याभरात या चित्रपटाचे नाव, कलाकारांची नावे जाहीर होतील आणि मग चित्रिकरणाला सुरूवात होईल, असे त्या म्हणाल्या. आज हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये ‘आयटम सॉंग’ ही सर्वमान्य गोष्ट झाली आहे. मात्र, त्याकाळी ‘भिंगरी’, ‘फटाकडी’ अशा चित्रपटांमध्ये सुषमाजींनी आयटम सॉंगसदृश्य गाणी केली होती. यात ‘भिंगरी’ चित्रपटातील गाण्यावर अरूणा इराणी, ‘फटाकडी’ चित्रपटात रेखा, ‘मोसंबी नारिंगी’ चित्रपटात जितेंद्र, ‘गुलछडी’ चित्रपटात रति अग्निहोत्री तर ‘भन्नाट भानू’ या चित्रपटात मौशुमी चॅटर्जी यांनी नृत्य केले होते. आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा चित्रपटनिर्मितीत सक्रिय होणाऱ्या सुषमाजी नविन काय प्रयोग करणार?, हा उत्सुकतेचा विषय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा