अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुष्मिताने बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी संध्याकाळी एक ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली आणि सुष्मिताच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर सुष्मितानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तिची एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट मात्र सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
सुष्मिता सेननं काही दिवसांपूर्वीच तिच्या मालदीव व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे रोमँटीक फोटो शेअर करत एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिल्यानंतर सुष्मिताची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय आणि युजर्स या पोस्टचं कनेक्शन ललित मोदींशी जोडत आहेत. ही ट्रीप सुष्मितानं ललित मोदींसोबत एन्जॉय केल्याचा अंदाज युजर्स लावताना दिसत आहेत.
आणखी वाचा- सुश्मिता सेनशी लग्नाच्या जोरदार चर्चा; लंडनमधून फोटो ट्वीट करत ललित मोदींचा मोठा खुलासा, म्हणाले…
मागच्या महिन्यात सुष्मिताने तिच्या मालदीव व्हेकेशनचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती समुद्र किनाऱ्यावरील स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सुष्मिताच्या मागच्या बाजूने शूट करण्यात आला होता. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना सुष्मिताने लिहिलं होतं, “मी तुला सांगू इच्छिते की तू माझ्या आयुष्यातलं प्रेम आहे.” यासोबत सुष्मिताने लिप्सचा इमोजी पोस्ट केला होता. आता युजर्स या व्हिडीओचं कनेक्शन ललित मोदींशी लावताना दिसत आहे. ही पोस्ट आणि विशेषतः त्या पोस्टचं कॅप्शन सुष्मितानं ललित मोदींसाठी लिहिलं होतं असं अंदाज लावला जात आहे.
दरम्यान ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर सुष्मिताच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच ते दोघंही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहेत, अशी कबुली दिली. ललित मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “माझ्या लग्नाबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्वीट करत आहे. आम्ही लग्न केलेलं नाही. सध्या आम्ही केवळ एकमेकांना ‘डेट’ करत आहोत. लग्न देखील एक दिवस होईल.” यासोबतच त्यांनी सुष्मितासोबतचे आणखी काही रोमँटीक फोटो शेअर केले आहेत.