बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या मात्र नंतर ललित मोदी यांनी यावर स्पष्टीकरण देत केवळ डेट करत असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यावर अद्याप सुष्मिताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण तिचा भाऊ राजीव सेनने मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुष्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर होत असताना तिच्या कुटुंबीयांसाठी मात्र ही गोष्ट हैराण करणारी असल्याचं तिचा भाऊ राजीव सेननं म्हटलं आहे. सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या अफेअरचं वृत्त समजल्यावर राजीव देखील हैराण झाला होता. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना त्याने सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती असं त्यानं सांगितलं. तर ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यानं, “या वृत्तामुळे मला धक्का बसला असला तरीही माझ्या बहीणीसाठी मी खुश आहे” असं म्हटलं आहे.

राजीव सेन म्हणाला, “मी यातल्या कोणत्याच गोष्टी माहिती नव्हत्या. मी अजूनही माझ्या बहिणीशी यावर बोललेलो नाही. तिच्याशी बोलल्यानंतरच मी यावर काही प्रतिक्रिया देऊ शकतो. सध्या तरी यावर मी काही बोलणं योग्य नाही. पण मी माझ्या बहिणीसाठी खूप खुश आहे.” दरम्यान ललित मोदी यांनी अचानक सुष्मितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र यावर सुष्मिताने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा- “तू माझं प्रेम आहेस…” ललित मोदींच्या डेटिंगच्या कबुलीनंतर सुष्मिता सेनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर सुष्मिताच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ज्यात त्यांनी, “अद्याप अद्याप आमचं लग्न झालेलं नाही तर फक्त एकमेकांना डेट करत आहोत” असं म्हटलं होतं.

Story img Loader