अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सुष्मितानं तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळत होती. यानंतर आता नुकतंच एका लहान मुलासोबत सुष्मिता सेनचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे सुष्मितानं दोन मुलींनंतर तिसरं मूल दत्तक घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता तिने या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच तो मुलगा कोणाचा आहे याबद्दलही तिने भाष्य केले आहे.
बुधवारी (१२ जानेवारी) रात्री सुष्मिता सेन तिच्या दोन मुलींसोबत वांद्रे येथे दिसली होती. यावेळी तिच्यासोबत आणखी एक मूल दिसले होते. यानंतर सोशल मीडियावर तिने तिसरे मुल दत्तक घेतले असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता स्वत: सुष्मिता सेनने सत्य उघड केले आहे.
सुष्मिता सेनने नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर त्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. यात तो मुलगा गाडीवर बसून सुष्मिता सेनसोबत छान गप्पा मारताना दिसत आहे. या फोटोसोबत स्पष्टीकरण देताना ती म्हणाली, “तो गोंडस मुलगा (Amadeus) माझ्या मित्राचा आहे, ज्याला मी माझा Godson मानते. माझा हा फोटो मुलाच्या आईने काढला आहे,” असेही तिने म्हटले.
सुष्मिता सेन मागच्या काही वर्षांपासून एकल पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. अद्याप अविवाहित असलेल्या सुष्मितानं २००० साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. आपल्या दोन्ही मुलींसोबत सुष्मिताचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्याच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.