बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुष्मिता सेन ही अद्याप अविवाहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुष्मिता सेनने लग्न न करता मुलं दत्तक घेण्यावर भाष्य केले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सुष्मिता सेनने एका होर्डिंगचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने स्वत:लाच लग्नापूर्वी मुल दत्तक घेण्यावरुन प्रश्न विचारला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुष्मिताने रेनी आणि अलिसाला दत्त घेण्यावरुन तिच्यावर झालेल्या टीकेबद्दल भाष्य केले आहे. पण तिने मात्र तिच्या या निर्णयाला आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचे म्हटले आहे.
सुष्मिता सेनने तिच्या या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले की, “मी फक्त २४ वर्षांची होती, त्यावेळी माझ्या हृदयातून रेनीचा जन्म झाला होता. हा माझ्यासाठी फार मोठा निर्णय होता. यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मूल दत्तक का घेतले? लग्न न करता तू मूलं कसे वाढवणार? तू एकल पालकत्वाची जबाबदारी घेऊ शकतेस का? तुझ्या या निर्णयाच्या तुझ्या करिअरवर आणि वैयक्तिक जीवनावर काही परिणाम झाला तर? असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित केले गेले. या प्रश्नांना काहीही अंत नव्हता. तसेच या निर्णयावर विविध मतही नोंदवण्यात आली होती.”
“मात्र तरीही मी माझ्या मनाला जे योग्य वाटले तेच केले. त्यावेळी मला माहित होते की मी आई होण्यासाठी तयार आहे आणि हा मी आतापर्यंत घेतलेला सर्वोत्तम निर्णय ठरला. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा मी हा निर्णय घेतला आणि आता मला रेनी आणि अलिसा या दोन सुंदर मुली आहेत”, असे सुष्मिता सेन म्हणाली.
“मी आता जे काही आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे मला माझ्या हृदयाचे अनुकरण करण्याचे धैर्य मिळाले आहे. मला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन, माहिती आणि समर्थन मिळाले. त्यामुळे ते शोधण्याची गरज लागली नाही. माझ्याबद्दलचे काही पूर्वाग्रह अजूनही थांबलेले नाहीत. पण त्यांनी तुम्हाला कधी थांबवू नये. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी ही एक आठवण आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोधा”, असेही तिने या पोस्टच्या शेवटी म्हटले.
दरम्यान सुष्मिता सेन ही गेल्या काही वर्षांपासून एकल पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. अद्याप अविवाहित असलेल्या सुष्मितानं २००० साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. आपल्या दोन्ही मुलींसोबत सुष्मिताचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्याच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.