बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुष्मिताने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र तिने तब्बल १० वर्षांचा ब्रेक घेतला. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यावर तिने चित्रपटांऐवजी वेबसीरीज करण्याचा निर्णय घेतला. सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली. नुकतंच एका मुलाखतीत तिने हा निर्णय का घेतला? यावर भाष्य केले आहे.
नुकतंच सुष्मिताने चित्रपट समीक्षक सुचरिता त्यागी यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सुष्मिताला पुनपर्दापणासाठी चित्रपटांऐवजी वेबसीरीज का निवडली, असा प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “मी जेव्हा बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला हवी तशी भूमिका मिळाली नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मी ब्रेक घेतल्यानंतर माझ्या दोन मुली रेनी आणि अलिसा यांचे संगोपन करण्याला प्राधान्य दिले.”
“मी सिनेसृष्टीतून जो १० वर्षांचा ब्रेक घेतला, त्याने मला प्राधान्यक्रम व्यवस्थित शिकवला. यात मला काय करावे आणि काय करु नये, याची योग्य ती कल्पना आली. चित्रपटातून मला जे हवं ते मिळत नव्हते. त्यातील बऱ्याच गोष्टी या माझे वय आणि माझ्या पडद्यावरील दिसणे यावर अवलंबून होत्या. मी गेली दहा वर्षे काम केले नव्हते”, असेही सुष्मिताने म्हटले.
त्यापुढे सुष्मिता म्हणाली, “माझी स्वत:ची क्षमता आणि लोकांशी संपर्क नसल्याने मी अशा अनेक संधी गमावल्या. त्यावेळी माझी मानसिकता काय होती, हे मला माहित नाही. पण मी स्वत:ला या सर्व गोष्टींमधून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यात कधीच चांगले नव्हते. मी नेटवर्किंगमध्ये चांगली नाही, त्यामुळेच ते माझ्या उपयोगी येत नाही.”
सुष्मिता ही २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात शेवटची झळकली होती. त्यानतंर तिने २०२० मध्ये हॉटस्टारवरील आर्या या वेबसीरिजद्वारे पुनपदार्पण केले. या वेबसीरिजमध्ये तिचा दमदार अभिनय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या अभिनयासाठी तिचं खूप कौतुकही झालं होतं.