भारत, एका असं लोकशाही राष्ट्र ज्याच्या राजकीय पटलावर दर दिवसाआड काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. याच सर्व परिस्थितीचा आधार घेत भारतीय राजकारणातील एका महत्त्वाच्या पर्वावर एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा काळ साकारण्यात येणार असून या चित्रपटातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर या चित्रपटातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारणार आहेत. त्यांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये इतरही बरेच कलाकार झळकणार आहेत. सध्या याच चित्रपटात सोनिया गांधी याची भूमिका साकारणाऱ्या जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुझान अगदी हुबेहुब सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच भाषणाचा सराव करताना दिसत आहे. व्यासपीठावर उभे असतना सोनिया गांधी यांची जी देहबोली असते त्याचप्रमाणे सुझानही आपण साकारत असलेल्या भूमिकेसाठी मेहनत घेत आहे. मुख्य म्हणजे तिच्या भाषणाचा हा व्हिडिओ पाहता खुद्द सोनिया गांधीच बोलत तर नाहीयेत ना, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन जातो.

वाचा : सट्टाबाजारात भाजपाला पसंती, ९६ ते ९८ जागा जिंकण्याची शक्यता

सुझानने याआधीही सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे. अभिनेते- दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सूत्रसंचालन कलेल्या प्रधानमंत्री या टेलिव्हिजन सीरिजमध्येही तिने सोनिया गांधींची भूमिका साकारली होती. सुझानचे संवादकौशल्य आणि तिची चेहरेपट्टी ही सोनिया गांधींशी फारच मिळतीजुळती असल्यामुळे याचा फायदाही चित्रपटात होणार हे नाकारता येणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिना अखेरीस या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होणार असून, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader