मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच स्वप्निल जोशी दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. स्वप्निलच्या चाहत्यांना उत्सुकता होतीच की बाळाचं नाव काय असणार? स्वप्निलने ही गोड बातमीही त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुकतेच या बाळाचे बारसे करण्यात आले.
राघव असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला विवाहबंधनात अडकले. त्यांना मायरा ही दीड वर्षांची मुलगी आहे. मायराचा जन्म २३ मे २०१६ झाला. आता राघवच्या येण्याने स्वप्निल- लीनाचे चौकटी कुटुंब पूर्ण झाले असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे या चिमुकल्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच स्वप्नीलच्या आईचा वाढदिवस असल्याने जोशी कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झालाय. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून ती मूळची औरंगाबादची आहे. सध्या स्वप्निल आणि लीनावर सोशल मीडियामार्फत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील अनेक मित्र-मैत्रीणीही या चिमुकल्याला पाहायला स्वप्निलच्या घरी आवर्जुन भेट देत आहेत.
स्वप्निलसाठी २०१७ हे वर्ष खूप खास होते. त्याचा ‘भिकारी’ हा सिनेमा याच वर्षात प्रसिद्ध झाला. त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या सिनेमालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच त्याने या वर्षात निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही नवीन मालिका सध्या प्रेक्षकांचे मन जिंकतेय. तसेच, तो मराठी सिनेमांचीही निर्मिती करतोय.