चित्रपट, टीव्ही आणि नाटक तिन्ही माध्यमांवर सध्या चांगलीच पकड असलेला अभिनेता स्वप्नील जोशी आता ‘आयपीएल’वारी करणार आहे. क्रिकेटचे वेड आहे म्हणून ही त्याची ‘आयपीएल’वारी नाही. तर ‘आयपीएल’मध्ये रंगणाऱ्या ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’च्या सामन्यात खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी स्वप्नीलला आमंत्रित करण्यात आले आहे. ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच मराठी कलाकाराला हा मान देण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात ऐन निर्णायक क्षणी शांत डोक्याने योग्य निर्णय घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला स्वप्नीलच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्टारस्पोर्ट्स डॉट कॉमच्या वतीने देण्यात येणार आहे. स्टारस्पोर्ट्स आयपीएलचा अधिकृत ऑनलाईन पार्टनर असून त्यांच्यावतीने प्रत्येक सामन्यादरम्यान हा खास पुरस्कार देण्यात येतो. यावेळी हा पुरस्कार देण्यासाठी स्टारस्पोर्ट्सने स्वप्नीलला संधी दिली असून पहिल्यांदाच आयपीएलच्या सामन्यांमध्ये हा पुरस्कार देण्याचा मान एका मराठी कलाकाराला देण्यात आला आहे.
सध्या स्वप्नील ‘स्टार प्रवाह’ वर नव्याने सुरू झालेल्या ‘ढाबळ’ या शोचा सूत्रसंचालक आहे. योगायोग म्हणजे स्वप्नील ‘आयपीएल’ नावाच्या चित्रपटातही काम करतो आहे. अर्थात, या चित्रपटाच्या कथानकाचा ‘आयपीएल’शी काही संबंध आहे की नाही माहिती नाही. पण, प्रत्यक्षात आणि पडद्यावरही स्वप्नील ‘आयपीएल’वारी करताना दिसणार आहे.

Story img Loader