कथेची गरज म्हणून आतापर्यंत कित्येक कलाकारांनी स्त्री वेष धारण केल्याची कित्येक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आता या शर्यतीत स्वप्नील जोशीनेही पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाहवरील ‘ढाबळ’ या कार्यक्रमासाठी स्वप्नीलने चक्क स्त्री वेष धारण केला आहे.
‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटामधील सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्त्री वेषाची बरीच चर्चा झाली होती. विजय चव्हाण आणि आता भरत जाधव यांची ‘मोरुची मावशी’ देखील प्रसिद्ध आहेच. हिंदी चित्रपटांमध्येही अगदी गोविंदापासून ते रितेश देशमुख, सैफ अली खानपर्यंत कित्येकांनी स्त्री पात्र निभावल्याची उदाहरणे पहायला मिळतील. स्त्री पात्र साकारण्यात मालिकेतील पुरुष कलाकारही मागे नाहीत. पण, आतापर्यंत आपली चोरी लपवण्यासाठी, महिलांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून मालिकेत किंवा सिनेमातही पुरुषांनी स्त्री वेष घेतल्याची कित्येक उदाहरणे आपल्या समोर आहेत. स्वप्नीलने मात्र हा स्त्री वेष धारण केलाय तो ‘सौंदर्य स्पर्धा’ जिंकण्यासाठी. कार्यक्रमात स्वप्नीलचा सत्यामामा सोसायटीमधील सर्व महिलांसाठी ‘महिला सौंदर्य स्पर्धा’ आयोजित करतो. इतकेच नाही तर विजेतीसाठी तब्बल एक लाखाचे बक्षीसही जाहिर करतो. हे ऐकल्यावर सहाजिकच स्वप्नील, काणे काका आणि जटायू या तिघांच्या मनात स्पर्धेत सहभागी व्हायचा विचार फेर घालू लागतो आणि ते स्त्री वेष धारण करून स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवतात.
आता स्वप्नीलचं हे स्त्रीपात्र प्रेक्षकांवर किती मोहिनी घालतंय आणि यामुळे तो स्पर्धा जिंकू शकेल की त्याची फसगत होईल हे पाहण्यासाठी ढाबळीत डोकवावेच लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा