शीर्षक वाचून जरा चक्रावला असाल ना…पण लवकरच शीर्षकाचा उलगडा होईल. ही बातमी आहे स्वप्नील जोशीच्या नव्या चित्रपटाविषयीची. त्याने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी एका नव्या आणि वेगळ्या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘बळी’. स्वप्नीलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये एक मळकट, जखमी हात स्वप्नीलच्या गळ्याभोवती आवळलेला आहे. स्वप्नीलच्या कपाळावर रक्ताचे डाग आहेत आणि तो घाबरुन ओरडताना दिसत आहे.
View this post on Instagram
या पोस्टरवर चित्रपटाच्या नावासोबत “कोण आहे एलिझाबेथ?” हा प्रश्नही दिसत आहे. तसंच स्वप्नीलने हे पोस्टर शेअर करताना जे कॅप्शन दिलं आहे, त्यात तो म्हणतो, “एलिझाबेथच्या जाळ्यामधून कोणीही सुटू शकत नाही. पण कोण आहे एलिझाबेथ? जाणून घ्या बळीमध्ये. येत आहे १६ एप्रिलला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.”
आता ही एलिझाबेथ कोण हे रहस्य उलगडणारा हा चित्रपट आहे असं दिसत आहे. एकूणच पोस्टरवरचा फोटो, अक्षरांचे फाँट्स पाहता हा भयपट, रहस्यपट असू शकतो असा अंदाज लावायला हरकत नाही. पण खरं काय ते १६ एप्रिलला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याचवेळी लक्षात येईल.
या चित्रपटात स्वप्नीलसोबत अभिनेत्री पूजा सावंत आणि समर्थ जाधव हेही कलाकार दिसणार आहेत. त्याच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशी याने चित्रपटासाठी शुभेच्छा देत कमेंट केली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक आदित्य सरपोतदारनेही स्वप्नीलला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.