संजय लीला भन्साळींची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, शाहरुख खानचीही मराठीतील पहिली निर्मिती असलेल्या चित्रपटात स्वप्निल, दाक्षिणात्य दिग्दर्शक आर. मधेश यांच्याही पहिल्या मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी.. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि सर्वात व्यग्र अभिनेता असलेल्या स्वप्निलकडे सध्या सहा मराठी चित्रपट आहेत. त्यापैकी तीन चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत, तर दुसऱ्या तीन चित्रपटांसाठी त्याच्याबरोबर करार करण्यात आला आहे. मराठीत अशा पद्धतीने एकाचवेळी तीन चित्रपटांचा करार करणारा स्वप्निल जोशी हा पहिला अभिनेता ठरला आहे.
संजय केलापुरे, प्रेम व्यास आणि मनुष चंदा यांची निर्मिती असलेल्या ‘फ्रेंड्स’ या मराठी चित्रपटात स्वप्निल अभिनेता म्हणून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक आर. मधेश यांचा मराठीतला दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून त्यात स्वप्निल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच स्वप्निलचे काम पाहून भारावलेल्या संजय केलापुरे यांनी स्वप्निलला एकापाठोपाठ एक अशा तीन चित्रपटांसाठी करारबद्ध केले आहे. स्वप्निल हा मराठीतील सगळ्यात लोकप्रिय असा अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत जे चित्रपट केलेत त्या सगळ्या चित्रपटांनी अमाप यश मिळवले आहे. त्यामुळे आमच्याही चित्रपटासाठी त्याच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय आमच्यासमोर नव्हता, असे केलापुरे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्याला तीन चित्रपटांसाठी करारबद्ध करण्याची पद्धत आहे. स्वप्निलबरोबर आम्हाला आणखी काम करायची इच्छा आहे. तो सध्या चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने आम्ही त्याच्यासाठी तीन चित्रपटांचा करारच केला आहे, असे केलापुरे यांनी सांगितले.
मराठीत पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्याबरोबर तीन चित्रपटांचा करार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली, यात आनंद वाटतो, अशी भावना स्वप्निलने व्यक्त केली. संजय केलापुरेंसारख्या निर्मात्यांनी आपल्यावर जो व्यावसायिक विश्वास टाकला आहे, त्याबद्दल अतिशय कृतज्ञ असल्याचे मत व्यक्त करताना मराठीतही यापुढे असा पायंडा पडला तर त्याचा जास्त आनंद होईल, असे स्वप्निलने सांगितले. ‘मुंबई पुणे मुंबई २’च्या यशाचा जल्लोष अजूनही सुरू असताना स्वप्निल एकापाठोपाठ एक चित्रिकरणात अडकला आहे. संजय लीला भन्साळींचा चित्रपट आणि ‘फ्रेंड्स’ या चित्रपटासह ‘फुगे’ हा त्याचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होतो आहे. यात सुबोध भावे आणि तो पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याची माहिती स्वप्निलने दिली.

Story img Loader