गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात असतानाच हा हल्ला झाला. आता या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक ट्वीट करीत याबाबत निषेध व्यक्त केला.
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपले मत मांडताना दिसते. तर आताही माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची हत्या होणे हे अराजकतेचे संकेत आहेत असे ती म्हणाली.
स्वराने ट्वीट करीत लिहिले, “अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट नाही. हे अराजकतेचे लक्षण दर्शवते. राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करीत आहेत हे यातून दिसून येते. हे कठोर शासन नाही, ही अराजकता आहे.” आता तिचे हे ट्वीट खूप चर्चेत आले असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
नेमके काय घडले?
२००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद आणि अशरफ दोघेही अटकेत आहेत. अतीकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना उमेश पाल हत्या प्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हेही वाचा : “आता मला कामं मिळणंही बंद झालंय, कारण…”; स्वरा भास्करने व्यक्त केली खंत
अतिक आणि अशरफ या दोन भावांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले जात असताना काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. अतिक माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात करणार इतक्यात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात या दोघांना आपला जीव गमवावा लागला.