आपल्या देशात शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमधील वाद कधीच न संपणारा आहे. खाद्यसंस्कृती आणि कलाक्षेत्रासाठी नावाजल्या जाणाऱ्या कोलकाता शहरामध्ये हा वाद अगदीच टोकाचा आहे. कोलकात्यातच शेजारी-शेजारी राहणाऱ्या पण, शाकाहारी-मांसाहारी या वादामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या दोन कुटुंबांना जोडण्यासाठी धडपडणाऱ्या ‘स्वरा’ आणि ‘रागिणी’ या दोन मुलींची कथा ‘कलर्स’च्या आगामी ‘स्वरागिनी’ या मालिकेमध्ये सांगण्यात येणार आहे. हा वाद मिटवण्याचा मार्ग म्हणून त्या चक्क संगीताची निवड करतात.
शाकाहारी लोक  इतर घरांमधून येणारा मांसाहारी पदार्थाचा वास सहन करू शकत नाहीत. मांसाहारी लोक शाकाहारींना ‘पालापाचोळ्या’चं जेवणारे म्हणून टिंगल करतात. त्यामुळे वरवर अतिरेकी वाटणारा हा वाद आपल्या देशात प्रत्यक्षात सीमाप्रश्नापेक्षाही मोठा आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कोलकाता शहर हे खरं तर दोन्ही प्रकारच्या खवय्यांसाठी पर्वणी ठरलेलं शहर आहे. इथल्या खाद्यसंस्कृतीत मासे आणि त्यापासून तयार केलेल्या पदार्थाचे वर्चस्व एकीक डे तर रसगुल्ला, संदेश अशा पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटणाऱ्या मिठाया, वेगळ्या प्रकारचे चाट अशा खाद्यपदार्थाची रेलचेल दुसरीकडे.. म्हणजे चविष्टपणा दोन्हीकडे आहेच. तरीही अशा खाद्यसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्टय़ा परिपूर्ण अशा शहरात बोस आणि गडोदियाँ ही दोन कुटुंबे या वादामुळे एकमेकांपासून दुरावली आहेत. बोस कुटुंबामध्ये शोभा बोस, त्यांची मुलगी शर्मिष्ठा आणि नात स्वरा असं छोटं कुटुंब आहे. बंगाली असलेल्या बोस कुटुंबाचे मासळीशिवाय पान हलत नाही. तर मारवाडी गडोदियाँ कुटुंब मात्र शुद्ध शाकाहारी आहे. या कुटुंबातील पार्वती, त्यांचे पती, मुलगा विनोद हे या मासळीच्या वासाला आणि म्हणून बोस कुटुंबाला अजिबात सहन करू शकत नाहीत. पण, पार्वतीची नात रागिनीची मतं मात्र वेगळी आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये वरवर खाण्यावरून भांडणं असली तरी त्याला स्वरा आणि रागिणीच्या आई-वडिलांच्या भूतकाळाची एक काळी किनार आहे. आधुनिक, नव्या विचारांची स्वरा आणि नव्या वळणाची असूनही परंपरा जपणारी रागिनी यांना मात्र त्यांच्या कुटुंबातील हा दुरावा खटकतो आहे. त्यामुळे त्या आपापल्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी धडपडत आहेत.  
कलाक्षेत्रामध्येही कोलकातावासी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. संगीत, नाटय़ आणि सिनेमाच्या क्षेत्रामध्ये तर त्यांचा दबदबा आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कोलकात्याचा वारसा दखल घेण्यासारखाच आहे. संगीताचा वारसा ही एकमेव गोष्ट या दोन कुटुंबांमधील दुवा आहे आणि हेच संगीत त्या दोघींच्या मदतीस येते. स्वरा गिटार वाजवण्यात कुशल आहे आणि रागिनीने शास्त्रीय संगीतामध्ये नैपुण्य मिळविले आहे. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून दोन कुटुंबांना एकत्र आणणं या ‘स्वरागिनी’ला कसं शक्य होतं याची ‘बाबूमोशाय’च्या शहरातील ही कथा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा