‘आशिक’, ‘आशिकी’ हे दोन शब्द जरी उच्चारले तरी ‘लैला-मजनू’, ‘रोमिओ-ज्युलिएट’ यांसारख्या जोड्या आणि त्यांच्या लव्हस्टोरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आशिकी म्हटलं की प्रेमातला वेडेपणा, जीव ओतून जोडीदाराला खूश करण्याचे प्रयत्न या गोष्टी हक्काने येतातच. अशीच आशिकी आता मराठीत पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवया कळत नाही त्याचप्रमाणे आशिकी म्हणजे काय हे वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम केल्याशिवाय कळत नाही. अशीच एका नव्या जोडीची लव्हस्टोरी ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट घेऊन येत आहे.

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. गेल्यावर्षी पिळगांवकर यांनी त्यांच्या वाढदिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण अभिनयची हिरोईन कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले. मात्र टीझर पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात न आल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

वाचा : ‘पाटील’ चित्रपटाला लोकप्रतिनिधींची कौतुकाची थाप

गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनासोबत सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील त्यांनीच लिहिले आहेत.

‘अशी ही आशिकी’ची ही रोमँटिक जर्नी ‘व्हॅलेंनटाईन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.