बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट ‘शाबाश मिठु’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये तापसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत तापसीनं तिच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा शेअर केला. तापसी मित्रांसोबत व्हेकेशनसाठी गोव्याला गेली असताना एक मुलगी तिच्या प्रेमात पडली होती.

‘शाबाश मिठु’च्या प्रमोशनच्या वेळी तापसीला, “तुझ्यासोबत काम करणाऱ्या किंवा अन्य कोणत्याही मुलीच्या कधी प्रेमात पडली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तापसीनं गोव्यात तिच्यासोबत घडलेला मजेदार किस्सा शेअर केला. तापसी म्हणाली, “काम करताना तर नाही पण मी जेव्हा गोव्यात माझ्या मित्रांसोबत व्हेकेशनसाठी गेले होते. तेव्हा माझ्यासोबत एक मजेदार घटना घडली होती. मला पहिल्यांदा काही जाणवलं नव्हतं पण नंतर माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की एक मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे.”

आणखी वाचा- “यासाठी १० वर्षं लागली पण…” तापसी पन्नूनं शाहरुख खानबाबत केलेलं ट्वीट चर्चेत

याबद्दल बोलताना तापसी म्हणाली, “माझ्या मित्राने जेव्हा मला सांगितलं की एक मुलगी माझ्या प्रेमात आहे. तेव्हा मला खूप छान वाटलं होतं कारण सामान्यतः एक मुलगी दुसऱ्या मुलीमध्ये नेहमीच चुका शोधत असते. त्यामुळे एका मुलीला मी आवडते हे समजल्यावर मला खूपच भारी वाटलं होतं.” जेव्हा हाच प्रश्न क्रिकेटर मिताली राजला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “कदाचित मी पण कोणत्यातरी मुलीला आवडले असेन पण मला तसं कधी जाणवलं नाही.”

दरम्यान क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक ‘शाबाश मिठु’चं दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी यांनी केलं आहे. ज्यात अभिनेत्री तापसी पन्नू आणि विजय राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय तापसीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’ आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’मध्ये शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader