चित्रपटसृष्टीत कोणाचीही ओळख नसताना स्वत:च्या अभिनय कौशल्यावर स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचे नाव घेतले जाते. मनोरंजनसृष्टीत कोणीही वाली नसताना तिने आपल्या अभिनयाची कारकीर्द ‘झुमंदी नादम’ या २०१० साली आलेल्या तेलुगू चित्रपटातून केली, तर हिंदी चित्रपटसृष्टीत ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत दहा वर्षांचा पल्ला गाठला आहे.
नवोदित ते आघाडीची अभिनेत्री म्हणून तापसीचा प्रवास या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींसाठी प्रेरणादायी आहे असेच म्हणावे लागेल. हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तापसीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी घेतलेल्या तापसी पन्नूने अभिनय क्षेत्रात नव्याने आपली कारकीर्द घडवली. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. शूजित सरकारच्या ‘पिंक’ या चित्रपटामुळे तापसीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तापसीने आजवर ‘बेबी’, ‘नाम शबाना’, ‘सूरमा’, ‘द गाझी अटॅक’, ‘पिंक’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मुल्क’, ‘सांड की आँख’, ‘थप्पड’ आणि ‘शाब्बास मिथू’सारख्या विविध आशय आणि विषयांच्या चित्रपटांत काम केले आहे. तापसी लवकरच राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर झळकणार असून तिचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.