Zakir Hussain Movies: प्रसिद्ध तबला वादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. ७३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते झाकीर यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
झाकीर हुसैन यांनी अगदी लहान वयातच तबला वाजवायला सुरुवात केली होती आणि नंतर त्यांनी याच क्षेत्रात करिअर केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रासाठी समर्पित केले. मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल की ते संगीतकार, तबलावादक असण्याबरोबरच एक उत्कृष्ट अभिनेते देखील होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी शशी कपूर यांच्या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
झाकीर हुसैन यांचे चित्रपट
प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांना त्यांचा सोलो अल्बम ‘मेकिंग म्यूझिक’मधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी अभिनयही केला. ‘हीट अँड डस्ट’, ‘साज’, ‘मंटो’, ‘मिस बीटीज चिल्ड्रन’ अशा जवळपास १२ चित्रपटांमध्ये झाकीर हुसैन यांनी काम केलं आहे. त्यांनी अभिनेता म्हणून १९८३ मध्ये आलेला चित्रपट ‘हीट अँड डस्ट’मधून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात शशी कपूर मुख्य भूमिकेत होते.
झाकीर हुसैन यांनी १९९७ मध्ये आलेल्या ‘साज’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटात शबाना आझमी यांनी झाकीर यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. या व्यतिरिक्त झाकीर यांनी अनेक चित्रपट केले. २०१२ मध्ये आलेल्या ‘चालीस चौरासी’मध्येही ते झळकले होते. यंदा प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या देव पटेलच्या ‘मंकी मॅन’ सिनेमातदेखील झाकीर हुसैन यांनी काम केलं होतं.
दिलीप कुमार यांच्या ‘या’ चित्रपटाची आलेली ऑफर
झाकीर हुसैन यांना ऐतिहासिक चित्रपट ‘मुघल ए आझम’ची ऑफर आली होती. या चित्रपटात त्यांना सलीम (दिलीप कुमार) यांच्या लहान भावाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं; मात्र त्यांनी नकार दिला होता. कारण त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित करावं, असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं.