सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टेक केअर गुड नाइट’हा चित्रपट महिन्याअखेरिस प्रदर्शित होत आहे. सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात आता दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकरदेखील विशेष भूमिकेत दिसणार आहे.
गिरीश जोशी दिग्दर्शित चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी यांनी काही वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे त्रिकूट रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सायबर गुन्हेगारीला बळी पडलेल्या कुटुंबाची कथा या चित्रपटातून उलगडत जाणार आहे.
सायबर गुन्हेगारीचा फटका बसणारे ७० टक्के लोक हे उच्चशिक्षित असतात. तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसाच तोटादेखील आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये. सायबर क्राईम कोणत्या थराला जाऊ शकतं याचा अनुभव सांगणारा हा चित्रपट आहे ” असं लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी म्हणाले.
‘मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका आव्हानात्मक आणि वेगळी आहे असं मांजरेकर म्हणाले. सचिन खेडेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेबरोबरच महेश मांजरेकर यांची वेगळी भूमिका या चित्रपटात असल्यानं प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.