ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सल्ला
आपल्या देशाला चारही बाजूंनी शत्रूंनी वेढले आहे. सैनिक अहोरात्र सीमेवर पहारा देत असताना दहशतवाद्यांचे हल्ले वाढतच आहेत. ‘व्हॉट्स अॅप’, ‘फेसबुक’वर वेळ वाया घालवू नका. आपल्या विरोधात शत्रूला शस्त्र उगारण्यास धाक वाटला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्या, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि जागतिक मराठी अकादमीच्या ‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी येथे केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप शनिवारी रात्री झाला. यावेळी अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक अविनाश राचमाले, आमदार डॉ. सुनील देशमुख, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष गिरीश गांधी उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमातच चित्र-शिल्प-काव्य ही तिहेरी मैफीलही रंगली. विक्रम गोखले म्हणाले, तरुणांनी स्वत:ला ओळखायला शिकले पाहिजे. करण्यासारखे बरेच काही आहे. आपल्याला देशासाठी काय करता येईल, याचा प्रथम विचार केला पाहिजे.
पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, देशात अशा दुर्देवी घटना घडत असताना विविध पक्षाचे राजकीय नेते दूरचित्रवाहिन्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतलेले दिसतात तेव्हा विचित्र वाटते. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सर्व पुढाऱ्यांनी किमान अशा काळात तरी एकवाक्यता ठेवली पाहिजे.
अविनाश राचमाले म्हणाले, ‘तीस वर्षांपूर्वी जेव्हा भारताबाहेर पडलो तेव्हा फक्त जिज्ञासा होती, पण इंग्रजी भाषेपासून ते अमेरिकेतील कार्यशैलीपर्यंत सारे काही आत्मसात करावे लागले. शेतकरी कुटूंबात एका खेडेगावात जन्मलेला मी केवळ आईवडिलांच्या शिकवण्याच्या जिद्दीमुळे अमेरिकेत उद्योजक म्हणून सिद्ध होऊ शकलो. माणसाला चांगले जगण्यासाठी मूलभूत तत्वांची गरज असते. त्याशिवाय यशही मिळू शकत नाही. मराठी भाषेचा देणेकरी या नात्याने आपण विदेशात किंवा महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सहकार्य करीत असतो.
डॉ. सुनील देशमुख म्हणाले, जागतिक मराठी अकादमीचे संमेलन अमरावतीत आयोजित होणे, हा आयुष्यभर आठवणीत राहणारा प्रसंग आहे. वैचारिक मेजवानी या संमेलनाने दिली आहे. जे ज्ञान या संमेलनातून मिळाले, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. डॉ. देशमुख यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक निशांत गांधी आणि सोमेश्वर पुसतकर यांचे कौतूक केले.
गिरीश गांधी म्हणाले, जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनांच्या आयोजनामागील कष्टाची परिस्थिती समजावून सांगितली. काही लोक गर्दी कमी होती म्हणून टीका करतात. त्यांची कीव कराविशी वाटते, पण अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. आयोजनासाठी अनेक कार्यकर्ते झटत असतात. त्यांना नाउमेद करू नका, असे आवाहन गिरीश गांधी यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा