समाजात जे घडते त्याचे प्रतिबिंब किंवा पडसाद चित्रपटातून उमटतात किंवा चित्रपटातून जे दाखवले जाते त्याचा परिणाम समाजावर होत असतो, असे म्हणतात. नेमके कशामुळे काय होते हा वादाचा आणि चर्चेचा विषय असला तरी समाजात घडलेल्या काही घटना, प्रसंग हे लोकांपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मोह अनेक दिग्दर्शकांना होत असतो. बॉलीवूडचे पाठबळ असूनही आत्तापर्यंत निवडक चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी दिल्लीत गाजलेल्या एका प्रकरणावर चित्रपट तयार के ला आहे.
ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या अशाच एका खळबळजनक प्रकरणावरील हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नवी दिल्लीतील नोएडा येथे घडलेले ‘आरुषी हत्या’ प्रकरण संपूर्ण देशभर गाजले. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा ‘तलवार’ हा चित्रपट याच हत्या प्रकरणावर आधारित आहे. २००८ मध्ये घडलेल्या या घटनेवरील चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून चित्रपटाचे पोस्टर अभिनेत्री कोंकणा सेन हिने ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
‘आमचा नवा चित्रपट ‘तलवार’ येत्या २ ऑक्टोबर रोजी
प्रदर्शित होत आहे’ असे ट्विट कोंकणा सेन हिने केले आहे. चित्रपटात इरफान खान, तब्बू आणि कोंकणा सेन-शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.