तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडीयन सूरी हा सध्या त्याच्या ‘विदुथलाई पार्ट १’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एक वाद निर्माण झाल्याने तामिळनाडूमध्ये याची चर्चा आहे. तामिळनाडूमधील एका आदिवासी कुटुंबाला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आल्याने एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.
चेन्नईमधील ‘रोहिणी थिएटर’मध्ये हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘विदुथलाई’ चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका आदिवासी कुटुंबाला चित्रपटगृहातील तिकीट तपासणाऱ्या दोन लोकांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना थिएटरबाहेर हाकललं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा : “बड्या मराठी चॅनल्स आणि निर्मात्यांनी ‘मुळशी पॅटर्न’ नाकारलेला” प्रवीण तरडेंचा मोठा खुलासा
चित्रपटगृहांच्या मालकांचे म्हणणे आहे कि या चित्रपटाला यु/ए प्रमाणपत्र मिळालं आहे त्यामुळे या कुटुंबामध्ये १२ वर्षाखालील लहान मुलगा बरोबर असल्याने त्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. याविषयी अभिनेता सूरी यानेही खंत व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “चित्रपटगृह हे सगळ्यांसाठी एकसमान आहे. रोहिणी थिएटरचा हा कारभार अजिबात योग्य नाही. त्या आदिवासी कुटुंबाला प्रवेश नाकारण्यात आला याचं मला दुःख आहे.”
‘विदुथलाई पार्ट १’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी केलं आहे. २५ वर्षं तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सूरीला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच एक मुख्य आणि मोठी भूमिका मिळाली आहे. त्याचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. याबरोबरच या चित्रपटात विजय सेतुपती, गौतम वासुदेव मेनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ३१ मार्च रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला आहे.