प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वेट्री दुराईसामीचा मृतदेह अखेर सापडला आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. ४ फेब्रुवारीला झालेल्या कार अपघातानंतर वेट्री बेपत्ता होता. सोमवारी हिमाचल प्रदेशातील सतलज नदीत ४५ वर्षीय वेट्रीचा मृतदेह सापडला आहे. वेट्री चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी शिमल्याला गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.
वेट्री हा चेन्नईचे माजी महापौर सईदाई दुराईसामी यांचा मुलगा आहे. तो त्याच्या मित्राबरोबर कारने प्रवास करत होता. काझाहून शिमल्याकडे जात असताना लाहौल-स्पिती भागात राष्ट्रीय महामार्ग पाचवर काशांग नाल्याजवळ त्यांची कार नदीत कोसळली होती. वेट्रीचा मित्र गोपीनाथला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी लाहौल आणि स्पितीचा रहिवासी तनजीन नावाच्या ड्रायव्हरचा मृतदेह सापडला होता.
किन्नौर पोलीस, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, होमगार्ड व गोताखोरांनी सतलज नदीच्या काठावर ४ फेब्रुवारीपासून संयुक्त शोध मोहीम राबवली होती. बेपत्ता वेट्रीचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला होता. दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतर वेट्रीचे वडील सईदाई दुराईसामी यांनी आपल्या मुलाचा शोध घेणाऱ्याला १ कोटी रपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांना मदत करण्याचे आवाहनही केले होते.
ई-टाइम्सने हिमाचल प्रदेश पोलीस नियंत्रण कक्षाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही गेल्या नऊ दिवसांपासून बचाव कार्य करत होतो आणि सोमवारी त्याचा मृतदेह अपघातस्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर सापडला. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला सुंदर नगरजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास पाण्यात तरंगत असलेला मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह चेन्नईला नेण्यात येईल.”
शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असं पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.