प्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटनीची मुलगी मीराने १९ सप्टेंबर रोजी पहाटे राहत्या घरात आत्महत्या केली. ती अवघ्या १६ वर्षांची होती. मीराने आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं, याबाबत अद्यात माहिती समोर आलेली नाही. पण लेकीच्या निधनानंतर विजय अँटनीने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास
विजय अँटनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने मुलीच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलं, “प्रिय लोकांनो, माझी मुलगी मीरा खूप प्रेमळ आणि धाडसी होती. जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि द्वेष या गोष्टी नाहीत, अशा शांत आणि चांगल्या ठिकाणी ती आता गेली आहे. ती माझ्याशी बोलत आहे. मीही तिच्याबरोबर मेलो आहे आणि आता मी तिच्यासाठी वेळ घालवत आहे. आता मी तिच्या नावाने सर्व चांगल्या गोष्टी करेन आणि त्याची सुरुवात ती करेल, आपलाच विजय अँटनी.”
विजयच्या या भावुक पोस्टवर चाहते व इंडस्ट्रीतील कलाकार कमेंट्स करून धीर देत आहेत. ‘आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या’, ‘तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, तुम्ही खंबीर राहा’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, मीरा १९ सप्टेंबरला तिच्या चेन्नईमधील अलवरपेट येथील राहत्या घरी पहाटे ३ वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. ती चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती.