साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार सिद्धार्थबद्दल सोशल मीडियावर एक अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्या फॅन्सचा जीव भांड्यात पडला. बराच काळ गोंधळ उडाल्यानंतर तमिळ अभिनेता सिद्धार्थने स्वतः पुढे येत या अफेवेवर पूर्णविराम लावला आणि ट्विट करत सत्य परिस्थिती सांगितली. अभिनेता सिद्धार्थने शेअर केलेल्या या ट्विटनंतर त्याच्या फॅन्सना दिलासा मिळाला.

अभिनेता सिद्धार्थला मृत घोषित केलं

यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या दहा साउथ इंडियन सेलिब्रिटींची नावं दाखवण्यात आली. या यादीमध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थचं सुद्धा नाव देण्यात आलं. एका फॅनने या व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ दिसून येत आहे.

यूट्यूबने दिलं हे विचित्र उत्तर

अभिनेत्री सौंदर्या हिचं निधन 2004 साली झालं. तर अभिनेत्री आरती अग्रवाल हिने 2015 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण तमिळ सुपरस्टार सिद्धार्थ जिवंत आहे. अभिनेता सिद्धार्थला जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबाबत कळलं, त्यावेळी त्याने यूट्यूबकडे तक्रार केली. पण यावर यूट्यूबने जे उत्तर दिलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आम्हाला काहीच गैर दिसत नाही, असं उत्तर यूट्यूबने दिलंय.

सोशल मीडियावर सक्रिय असतो सिद्धार्थ

तमिळ अभिनेता सिद्धार्थ त्याच्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो प्रत्येक मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत नेहमीच नोंदवत असतो. त्याने यापूर्वी करोना काळात अनेक समस्यांविरोधात आपला आवाज उठवला होता. इतकंच नव्हे तर त्याने अनेकदा सरकारवर सुद्धा निशाणा साधला होता.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अखेरीस तो ‘अरुवम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचा हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. सिद्धार्थने नुकतंच ‘महा समुद्रम’ या चित्रपटाचं शूटिंग संपवलंय. याशिवाय तो ‘इंडियन 2’, ‘टक्कर’, ‘नवरस’ आणि ‘शैतान का बच्चा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.