अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या सीरिजवर आणि निर्मात्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या सीरिजला ट्रोल केलं जात असून कलाविश्वातूनदेखील काही अंशी या सीरिजला विरोध केला जात आहे. यामध्येच आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सरकारला जाब विचारत या सीरिजचा निषेध केला आहे. “गेल्या बऱ्याच काळापासून सातत्याने आपल्या काही गोष्टींना लक्ष्य केलं जात आहे. आता तांडव आला आहे. मी सुरुवातीपासून एकच ओरडून ओरडून विचारतोय की सरकारला जाग का येत नाही, सेन्सॉर बोर्ड का जागं होत नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय याप्रकरणी का निर्णय घेत नाही त्यामुळे यापुढे कोणीही असा प्रयत्न करणार नाही. पुन्हा असा चित्रपट किंवा वेब सीरिज कोणी तयार करु शकणार नाही. हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असं मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “मला खरंतर असं म्हणायचं नाहीये, पण बहुतेक वेळा अशा कंटेटमध्ये मुस्लिम अभिनेता किंवा मुस्लिम दिग्दर्शकच असतात. हे जाणूनबुजून किंवा मुद्दाम केलं जातंय असं माझं म्हणणं नाही. पण, मग आता हे सगळं सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आता हिंदू शांत बसणार नाहीत. यावर सेन्सॉर लावलाच पाहिजे.”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तांडव सीरिजवरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या सीरिजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.