‘सुयोग’ने नव्याने रंगभूमीवर सादर केलेल्या आचार्य अत्रे लिखित ‘मोरुची मावशी’ या नाटकाची लोकप्रियता आज अनेक दशकांनंतरही कायम आहे. नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहे. नव्या संचातील ‘मोरुची मावशी’ अर्थात अभिनेता भरत जाधव झी मराठीवरील ‘सारेगमप’कार्यक्रमाच्या मंगळवारी (४ फेब्रुवारी) सादर होणाऱ्या भागात खास ‘मोरुच्या मावशी’च्या रूपात हे गाणे सादर करणार आहे. २९ वर्षांपूर्वी ‘सुयोग’ने सादर केलेल्या या नाटकात अभिनेते विजय चव्हाण यांनी ‘मोरुची मावशी’ साकरली होती. नाटकातील गाणी संगीतकार अशोक पत्की यांनी नवीन पिढीला आणि तरुणांना आवडेल अशा प्रकारे संगीतबद्ध केली होती. या नाटकातील ‘मोरुची मावशी’ म्हणजेच विजय चव्हाण यांनी तेव्हा नाटकात सादर केलेले ‘टांग टिंग टिंगा’ खूपच लोकप्रिय झाले होते. विजय चव्हाण नाटकात या गाण्यावर नाचही करायचे. ‘सुयोग’तर्फे नव्याने सादर झालेल्या या नाटकात आता भरत जाधव ‘मोरुची मावशी’ झाला आहे. भरत जाधव आपल्या स्वत:च्या खास शैलीत ही भूमिका आणि गाणे सादर करत आहे. ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप’ या नुकत्याच सुरू झालेल्या संगीत मैफलीत भरत जाधव ‘मोरुच्या मावशी’च्या वेषभूषेत रसिकांसाठी हे गाणे सादर करणार आहे. रात्री ९. ३० वाजता या भागाचे प्रसारण होणार आहे.

Story img Loader