शिवकालीन इतिहासाची पाने चाळली तर अनेक शूरवीराच्या कथा आपल्याला उलगडतील. बाजीप्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी पासलकर अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळेच या शूरवीरांपैकी एक असलेले तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून उलगडण्यात आली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका विशेष गाजली. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे धैर्य घोलप. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या धैर्य आता लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकले आहे. या दोन्ही कलाकारांच्या भूमिकांसोबतच धैर्य घोलपची भूमिकाही विशेष गाजली. तान्हाजी मालुसरे यांच्या सैन्यातील एका मावळ्याची भूमिका धैर्यने साकारली होती. यात उदय भान सिंहच्या (सैफ अली खान) हातून त्याचा मृत्यू झाल्याचं दाखण्यात आलं आहे. या चित्रपटानंतर धैर्य लवकरच ‘बावरा दिल’ या मालिकेत झळकणार आहे.
‘बावरा दिल’ या मालिकेत धैर्य सरकार या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्याने सैफ अली खानकडून प्रेरणा घेतल्याचं त्याने म्हटलं आहे. “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधील उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारली होती. हे मला पाहायला मिळालं. त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भूमिका रंगवताना होत आहे,” असं धैर्य म्हणाला.