यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया हा काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. त्याने समय रैनाच्या इंडिया गॉट लेटेंटमध्ये एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार केली गेली होती. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल गेले होते. रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या पॉडकास्टसाठी ओळखला जातो. त्याच्या पॉडकास्टमध्ये अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली आहे. आता रणवीरने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने या कठीण काळात त्याची साथ देणाऱ्यांचे आभार मानत आता नवीन सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे.
रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तो त्याच्या कुटुंबाबरोबर असल्याचे दिसत आहे; तर काही फोटोंमध्ये तो त्याच्या टीमबरोबर असल्याचे दिसत आहे. त्याने हे फोटो शेअर करीत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच हा पुर्नजन्म असून, एक नवीन सुरुवात करणार असल्याचे लिहिले आहे. त्याबरोबरच एक व्हिडीओ शेअर करीत रणवीरने म्हटले की भारतीय संस्कृती जाणून घेणे हे माझे पॅशन आहे. त्याविषयी मला आदर आहे. माझी कृती ही माझी जबाबदारी आहे. त्याची मी पूर्णत: काळजी घेईन. तसेच, ज्या लोकांनी या कठीण काळात साथ दिली, त्यांच्याप्रति त्याने कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. रणवीरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये अभय देवोल आणि एकता कपूर यांचा समावेश आहे.
या सगळ्यात तन्मय भट्टच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे. तन्मय भट्टने मजेशीर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने रणवीरच्या पोस्टवर लिहिले, “जर तुला बी प्राक तुझ्या पॉडकास्टमध्ये पाहिजे असेल तर ही कमेंट लाइक कर”, पुढे तन्मय भट्टने सबस्क्रायबर्सना उद्देशून लिहिले, “तुझ्या उरलेल्या सबस्क्रायबर्सबरोबर तू फोटो काढलेस हे पाहून छान वाटले.”


जेव्हा रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यावेळी गायक बी प्राकने एक व्हिडीओ शेअर करीत “मी रणवीर अलाहाबादियाच्या शोमध्ये जाणार होतो. पण, आता मी जाणे रद्द केले आहे”, असे रणवीर अलाहाबादियाने म्हटले. त्यानंतर काही दिवसांनंतर बी प्राकने आणखी एक व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना रणवीरला माफ करावे, असे म्हटले होते.
दरम्यान, रणवीरने इंडिया गॉट लेटेंटमध्ये वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रासह आसाममधून एफआयआर दाखल केल्या गेल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले होते. त्याबरोबरच रणवीरच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत घट झाल्याचेदेखील पाहायला मिळाले होते.