‘कलर्स मराठी इम्फा’च्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचे उद्गार
‘सिनेमा हे केवळ एक क्षेत्र आहे. त्यात केलेल्या कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता आहेच; पण त्याही पलीकडे आयुष्यात करण्यासारखं भरपूर आहे. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, सुनियोजित विकास अशा अनेक बाबतीत मला अजून खूप काही करायचं आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ‘कलर्स मराठी इम्फा’ सोहळय़ात मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठी कलाकारांना युरोपची समुद्रसफर घडवून आणणाऱ्या ‘नॉर्वेजियन एपिक क्रूझ’वर रंगलेल्या या पुरस्कार सोहळय़ाचे प्रक्षेपण येत्या रविवारी कलर्स मराठी वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
बार्सिलोना, नेपल्स (इटली), रोम, फ्लोरेन्स आणि कान अशा शहरांची सफर घडवणाऱ्या क्रूझवर ‘कलर्स मराठी इम्फा’ सोहळय़ाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मेळा जमला होता. मात्र, या कलाकारांसह भारतीय सिनेमाशी ओळख असलेल्या परदेशी पर्यटकांसाठीही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा या प्रमुख आकर्षण होत्या. आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत अल्लड, बिनधास्त, रोखठोक अभिनेत्री अशी ओळख कमावलेल्या तनुजा यांचा उत्साह वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही ओसरलेला दिसत नाही. समुद्रात घोंघावणारे अतिथंड वारे आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस असे वातावरण असतानाही तनुजा यांचा क्रूझवर मुक्त संचार होता. ‘येथे थंडी भरपूर आहे. पण म्हणून तुम्ही स्वत:ला कोंडून ठेवू शकत नाही. बाहेर गारठा असला तरी शरीरात भरपूर ऊर्जा आहे,’ हे त्यांचं उत्तर त्यांना शाल, स्वेटर देऊ करणाऱ्यांना निरुत्तर करत होते.
‘कलर्स मराठी इम्फा’ सोहळय़ात तनुजा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यापूर्वी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा पुरस्कार, मराठी चित्रपटांची भरारी आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन अशा विविध मुद्यांवर मनमोकळी मते मांडली. ‘जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीला ‘आता बस कर’ असं सांगण्याचा प्रकार आहे, असं मला अलीकडे वाटायला लागलं आहे. या पुरस्काराबद्दल मला कृतज्ञता वाटतेच; पण सिनेमाच्याही पलीकडे आयुष्यात करण्यासारखं भरपूर आहे. मला पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, निसर्ग या क्षेत्रात बरंच काही करण्याची इच्छा आहे,’ असं त्या म्हणाल्या.
पर्यावरणासाठी नेमकं काय करायचं आहे, असं विचारलं असता, त्या म्हणाल्या,‘आम्ही लोणावळा-खंडाळा सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून लोणावळय़ात काम करत आहोत. मी दोन वर्षांची होते तेव्हा माझ्या आईने लोणावळय़ात हे घर घेतलं होतं. आमचं बरंचसं बालपण येथेच गेलं. त्यामुळे या शहराशी मला खूप जवळीक वाटते. त्यावेळी लोणावळा, खंडाळा अतिशय सुंदर शहर होतं. पण आता त्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. कोणीही उठतो नि कोठेही बांधकामासाठी परवानगी देतो. अनधिकृत बांधकामे फोफावत चालली आहेत. त्यातच इथे येणाऱ्या पर्यटकांमुळे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. हे सारं रोखून लोणावळा आणि खंडाळा या पर्वतीय स्थळांचा पर्यावरणाभिमुख विकास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’
अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते तसेच बॉलीवूडमधील कलाकार मराठी चित्रपटांमध्ये आर्थिक गुंतवणूक करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मराठी चित्रपटांत काम करायला नक्की आवडेल असे सांगतानाच ‘चित्रपटाची कथा मला भावली आणि त्यातील भूमिकेची व्यक्तिरेखा मी साकारू शकते, असं वाटेल तेव्हा मी नक्की मराठी चित्रपट करेन,’ असं त्यांनी सांगितलं.
सिनेमाच्या पलीकडेही आयुष्यात करण्यासारखं भरपूर आहे!
‘सिनेमा हे केवळ एक क्षेत्र आहे. त्यात केलेल्या कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता आहेच.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-12-2015 at 05:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanuja get colors marathi imffa lifetime achievement award