बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. मधल्या काळात ती ‘मी टू’ चळवळीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. तिने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली. पण आता तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तनुश्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात तिचा अपघात झाल्याचं दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तनुश्री दत्ताचा नुकताच अपघात झाला आहे. अभिनेत्री महाकाल दर्शनासाठी गेलेली असताना तिच्या कारला अपघात झाला. याची माहिती स्वतः तनुश्रीनं तिच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून दिली आहे. तिने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत या दुर्घटनेबद्दल सांगितलं आहे. या फोटोंमध्ये तनुश्रीच्या पायाला दुखापत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा- “हिंदी राष्ट्रभाषा नाही फक्त देशात…” अजय देवगण- किच्चा सुदीप वादावर सोनू निगमची प्रतिक्रिया

तनुश्री दत्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. ज्यातील एका फोटोमध्ये तिच्या पायाला अपघात झाल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, ‘आज एक थरारक दिवस होता. अखेर महाकाल दर्शन झालं. पण मंदिरातून परतत असताना एक विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं माझी कार बिघडली आणि माझ्या पायाला दुखापत झाले. काही टाके पडले आहे. जय श्री महाकाल.’ या फोटोंमध्ये अभिनेत्री पायाला मोठी दुखापत झाल्याचं दिसून येत आहे.

तनुश्री दत्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि ती लवकर ठीक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान तनुश्री दत्तानं २००५ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इमरान हाश्मीसोबत तिने ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.

Story img Loader