बॉलिवूडमध्ये मी टु मोहीम सुरू करण्याचं श्रेय अभिनेत्री तनुश्री दत्ताला दिलं जातं. तिच्या एका ठोस भूमिकेमुळे कित्येक महिलांनी पुढे येत आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. बॉलिवूडच्या ग्लॅमसर दुनियेत स्त्रीयांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचा अनेक महिलांनी पर्दाफाश केला. या सगळ्यांना जगासमोर येऊन बोलण्याचं बळ तनुश्रीनं दिलं आणि बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांचं पितळ उघडं पडलं.
आता तनुश्री बॉलिवूडमधल्या लैंगिक शोषणाचं विदारक वास्तव लघुपटातून मांडणार आहे. बॉलिवूडमध्ये ज्यांचा कोणीही वाली नसतो अशा होतकरू नवीन अभिनेत्रींना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं म्हणूनच या दुनियेचं भीषण वास्तव मी या लघुपटात मांडणार आहे असं ती म्हणाली ८ मार्च म्हणजेच महिला दिनी हा लघुपट प्रदर्शित होणार असल्याची माहितीही तिनं दिली.
‘या लघुपटातून आपण अशा अनेक मुलींना मार्गदर्शन करणार आहोत. योग्य निर्णय कसा घ्यावा याविषयी मी त्यांना अनेक गोष्टी सांगणार आहे. तब्बल ९ वर्षांनी मी कॅमेराला सामोरी जात आहे त्यामुळे दडपण आहे पण हा लघुपट अनेकींना मार्गदर्शक ठरणार आहे’, असंही तनुश्री म्हणाली.
बॉलिवूडमध्ये मी टु मोहीम कधीही यशस्वी होऊ शकत नाही असं तनुश्री म्हणाली होती. ‘हॉर्न ओके प्लीज’ च्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप होता. या आरोपानंतर अनेक बॉलिवूड कलाकार समर्थनार्थ तिच्या पाठीशी उभे राहिले होते.