विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. या चित्रपटाचं एकीकडे कौतुक केलं जातंय तर दुसरीकडे या चित्रपटावरून वेगवेगळे वादही सुरू आहे. काही लोक चित्रपटाला पाठिंबा देतायत तर काही विरोध करतानाही दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री झालेल्या या चित्रपटानं आत्तापर्यंत २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची केवळ सामाजिकच नाही तर राजकीय स्तरावरही चर्चा झाली. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात आता अभिनेत्री तापसी पन्नूची देखील भर पडली आहे.
तापसी पन्नूनं विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला होणारा विरोध आणि वाद यावर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, ‘मी नंबर्स पाहिले. कारण यामागचं काहीही असलं तरीही चित्रपटानं खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. जर असा एखादा लहान आणि कमी बजेट असलेला चित्रपट एवढी कमाई करू शकतो तर मग तो वाईट चित्रपट तर असू शकत नाही. तुम्ही लोकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत असाल किंवा असणार नाही.’ तापसीची ही प्रतिक्रिया सध्या बरीच चर्चेत आहे.
आणखी वाचा- The Kashmir Files बाबत फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भडकल्या पल्लवी जोशी, म्हणाल्या…
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र यावर विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.