मराठी नाट्यसृष्टीतील अभिनेते प्रशांत दामले यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग काल षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘तारक मेहता’ मालिकेतील जेठालाल हे मध्यवर्ती पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले.
दिलीप जोशी प्रशांत दामलेंबद्दल बोलताना असं म्हणाले की “माझ्या मते १९९४, ९५ मध्ये प्रशांत दामले यांचे ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक पाहण्याचे भाग्य मला मिळाले, मी शपथ घेऊन सांगतो २५ वर्षांपूर्वी मी ते नाटक पहिले होते, ज्या पद्धतीची त्यांची एनर्जी, विनोदाचे टायमिंग होते ते आजही आहे. मला प्रशांतजींचा फोन आला होता की माझा १२५०० प्रयोग आहे तुम्हाला यावं लागेल, मी एक नाटक कलाकार असल्याने मी येणार होतोच. त्यांची खरी तरी ही समाजसेवा आहे कारण लोक नाटक बघण्यासाठी येतात तेव्हा ते त्यांचे दुःख विसरून जातात. प्रत्येक प्रयोग नव्याने करणे ही कठीण गोष्ट आहे. तरीदेखील ते उत्तमरीत्या सादर करतात. इतक्या वर्षांत त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या असतील मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ते कटिबद्ध राहिले आहेत. नक्कीच ते पदमश्री पद्मविभूषण या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.”
“मी मनाने तिथेच…” प्रशांत दामलेंच्या विक्रमी नाट्यप्रयोगला बिग बींनी मराठीत दिल्या शुभेच्छा
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक केले.ते असं म्हणाले, “आज प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या नाटकाचा प्रयोग झाला. इतके प्रयोग करणे करणे ही सोप्पी गोष्ट नाही. आज नाटक संपल्यावरही सर्व उपस्थित आहेत. त्यामुळे आमचीही नाटकं तुम्हाला चांगली वाटतात, हे या उपस्थितीतून कळते”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
अभिनेते प्रशांत दामले यांनी अनेक नाटकात काम केले आहे. त्यांनी लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांच्या नाटकांना रसिक प्रेक्षकांची गर्दी होत असते. मराठी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी काम केले आहे मात्र त्यांचे मन हे नाटकात तेच अनेक मुलाखतीत सांगत असतात.