Taraka Ratna Death: तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूडमधील अभिनेते नंदमुरी तारक रत्न यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवार (१८ फेब्रुवारी) उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाद्वारे राज्यामध्ये भव्य पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या केंद्रस्थानी चंद्राबाबू यांचे सुपुत्र नारा लोकेश हे होते. नारा लोकेश आणि तारक रत्न हे चुलत भाऊ आहेत. नारा लोकेश यांचे समर्थन करण्यासाठी तारक रत्न पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. जानेवारी २०२३ मध्ये कुप्पम येथे पदयात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने तारक रत्न रस्त्यावर कोसळले. पुढे लगेचच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले गेले आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते.

रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इंट्रा-ऑर्टिक बलून पंप (एबीपी) आणि व्हॅसोएक्टिव्ह सपोर्टवर बलून अँजिओप्लास्टीसह अँटीरियर वॉल मायोकार्डियल इन्फेक्शन झाले असल्याचे आढळले होते. इन्फेक्शन झाल्यानंतर कार्डिओजेनिक शॉकमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या स्थितीचे योग्य मूल्यमापन करुन त्यानुसार उपचार केले गेले. या काळात त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

“उदाहरणंही क्रिकेटची…” सायली संजीवच्या ‘त्या’ कॅप्शनचा नेटकऱ्यांनी लावला ऋतुराज गायकवाडशी संबंध, पोस्ट चर्चेत

तारक रत्न हे अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांचे नातू आणि मोहन कृष्णा यांचे सुपुत्र आहेत. ज्युनिअर एनटीआर हा त्यांचा भाऊ आहे. २००२ मध्ये तारक रत्न यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ओटीटीवर पर्दापण केले होते. ज्युनिअर एनटीआरसह अनेक सेलिब्रिटींनी तारक रत्न यांना श्रद्दांजली वाहिली आहे.

Story img Loader