मराठी रंगभूमीवर ‘ह हा हि ही हु हू’च्या बाराखडीने हास्यस्फोट घडवून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेल्या प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि दिग्दर्शित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाने नाबाद पाच हजारांचा पल्ला गाठला आहे. यानिमित्ताने रविवारी दादर येथे शिवाजी मंदिरात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकाचे आजवर विविध नाटय़संस्थांनी संयुक्त ४ हजार ९९९ प्रयोग केले. शिवाजी मंदिरात झालेल्या नाटकाच्या पाच हजारांव्या प्रयोगाला अभिनेते सचिन व अशोक सराफ यांच्यासह नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आणि या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून हजारो प्रयोगातून नाटकात भूमिका करणारे प्रा. मधुकर तोरडमल उपस्थित होते. रंगमंच, मुंबई व अमेय, सहरंग यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलताना प्रा. तोरडमल म्हणाले, नाटकाचे हजारो प्रयोग प्रयोग करून मी नाटकातून निवृत्ती घेतली. पण माझ्यानंतर अन्य नाटय़संस्थानी आत्तापर्यंत या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले आहेत. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर माझ्यासाठी हा दिवस ‘अजि सोनियाचा दिनू अमृते पाहिला’ असा आहे. अभिनेते सचिन आणि अशोक सराफ यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना तोरडमल यांच्याविषयीच्या काही आठवणी आणि किस्से सांगितले. निवेदिता सराफ आणि सुप्रिया पिळगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘तरुण तुर्क’ च्या संयुक्त पाच हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा