बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही अप्रत्यक्षपणे प्रियांकावर टीका केली होती. तस्लिमा नसरीन यांनी सरोगसीच्या माध्यमातून जन्म होणाऱ्या बाळांना रेडीमेड बेबी म्हणून संबोधले होते. यानंतर आता पुन्हा एकदा तस्लिमा यांनी यावर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे.
तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यावर त्या म्हणाल्या की, “मी सरोगसीबद्दल केलेले ट्वीट हे माझ्या सरोगसीवरील वेगळ्या मताबद्दल होते. याचा प्रियांका चोप्रा आणि निक जोनसशी काहीही संबंध नाही. मला ते जोडपे प्रचंड आवडते.”
“सरोगसीवरील माझ्या मतासाठी लोक मला शिव्या देत आहेत. भाड्याने गर्भधारणा होत नाही, ही माझी विचारसरणी जुनी आहे, असे अनेकांचे मत आहे. पण माझे असे मत आहे की तुम्ही मुलं दत्तक घ्या आणि गरीब महिलांवर अशाप्रकारे शारिरिक शोषण करु नका. खरं तर, कोणत्याही मार्गाने बाळ असणे ही एक कालबाह्य विचारसरणी आहे,” असेही तस्लिमा नसरीन म्हणाल्या.
“श्रीमंत महिला सरोगेट माता होईपर्यंत मी सरोगसी स्वीकारू शकत नाही. जोपर्यंत पुरुष बुरखा घालत नाहीत तोपर्यंत मी तो स्वीकारणार नाही. तसेच तोपर्यंत मी वेश्याव्यवसायही स्वीकारणार नाही. सरोगसी, बुरखा किंवा वेश्याव्यवसाय, हे सर्व केवळ महिला आणि गरीबांचे शोषण आहे,” असेही तस्लिमा यांनी सांगितले.
‘रेडीमेड बेबीज’ : तस्लिमा नसरीन यांच्या ‘सरोगसी’वरील वक्तव्याने खळबळ
दरम्यान प्रियांका आणि निकने सरोगसीद्वारे बाळ जन्म झाल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. “सरोगसीच्या माध्यमातून त्या मातांना त्यांची रेडीमेड मुलं मिळाल्यावर त्यांना कसे वाटते? मुलांना जन्म देणाऱ्या मातांप्रमाणेच त्यांच्या मुलांबद्दल भावना आहेत का?,” असे नसरीन यांनी म्हटले होते. “गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी नेहमीच समाजात गरिबी पहायची असते. जर तुम्हाला मूल वाढवायचे असेल, तर बेघरांना दत्तक घ्या. मुलांना तुमचे गुण वारसाहक्काने मिळाले पाहिजेत. हा फक्त स्वार्थीपणा आहे. अहंकारी अहंकार,” असेही नसरीन यांनी सांगितले.