ज्यात आपला जीव गुंतावा आणि तोच जीव कुणीतरी घेऊन पळून जावं. लहानग्यांच्या अपहरणाच्या घटना कित्येक घरांमध्ये कळीकाळाच्या जखमा ठेवून जातात. काळाचं औषध लागू पडलं तर अशा घटना विसरल्याही जातात. पण असं काय झालं असेल? कोणी पळवलं असेल आणि का?, या प्रश्नांची उत्तरं जर झोपू देत नसतील तर.. अपहरणाच्या घटनेनंतर मागे राहिलेल्यांच्या मनात जे भावनाटय़ सुरू होतं ते कित्येकदा कोणाच्या गावीही नसतं. रिभु दासगुप्ता दिग्दर्शित ‘टीई३एन’ या विचित्र नावाच्या चित्रपटात अपहरणकर्त्यांच्या शोधाबरोबरच समांतर अशा एका भावनाटय़ाचा उलगडा होत जातो तो पाहणाऱ्याला जखमेसारखा आत ठसठसत राहतो.
या चित्रपटाची कथा ‘माँटेज’ या कोरिअन चित्रपटाच्या कथेवरून बेतलेली आहे. मात्र इथे या चित्रपटाची कथा पूर्णपणे कोलकात्यात घडते, पहिल्या फ्रेमपासून त्याची जी मांडणी आहे ती पाहता साहजिकच आपल्याला हटकून सुजॉयच्या ‘कहानी’ चित्रपटाची आठवण येते. पण ‘कहानी’मध्ये ज्या वेगाने कथा पुढे सरकत राहते तो वेग, ती प्रभावी मांडणी ‘टीई३एन’ या चित्रपटाला नाही. हा चित्रपट काही मर्यादेपर्यंत अपहरणकर्त्यांचा सरधोपट पद्धतीने घेतलेला शोध इथपर्यंतच मर्यादित राहतो. मात्र काही कळायच्या आत एका क्षणाला चित्रपटाची कथा विलक्षण वळण घेते.
जॉन, सरिता आणि मार्टिन एकत्र असूनही त्याचा वेगवेगळया पद्धतीने आणि आपापल्या तर्काप्रमाणे शोध घेतात तेव्हा त्यांनी आता या क्षणाला एक त्र असायला हवं ही भावना आपल्याला अस्वस्थ करत राहते, पण तरीही ते एकत्र येत नाहीत. जॉन आणि मार्टिन परिस्थितीने या घटनेशी एकत्र जोडले गेले आहेत. जॉन अजूनही त्याच परिस्थितीत राहून सत्यासाठी झगडतो आहे तर मार्टिन मात्र त्या घटनेनंतर चर्चची वाट पकडून त्या वास्तवापासून दूर पळतो आहे. अपरहणाच्या घटनेनंतर या दोघांच्या मनात रंगलेलं भावनाटय़, त्यांचं अडकलेलं आयुष्य असा वेगळाच पैलू दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे केवळ रहस्यपट ठरत नाही मात्र त्याची मांडणी खूप संथ पद्धतीने होते. मध्यंतरानंतर चित्रपट खऱ्या अर्थाने पकड घेतो. अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि विद्या बालन असे तीन जबरदस्त कलाकार समोर असल्याने चित्रपटाचा प्रभाव पडतोच. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. अपहरणकर्त्यांला तुरुंगापर्यंत पोहोचवणं एवढाच जॉनचा ध्यास असतो का? एंजेलाचे दुर्दैवी मरण मार्टिनला पोलीस खात्यापासून दूर का नेते? आणि याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे चित्रपटात पूर्ण वेळ वावरलेल्या विद्या बालनला श्रेयनामावलीत ‘पाहुणी’ का म्हटलं आहे?, असे प्रश्न आपल्याला छळत असले. तरी हा चित्रपट अपहरणाच्या घटनांपलीकडे जात काही एक अस्वस्थता, काही एक विचार मनात सोडून जातो हेही नक्की!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा