‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्ट्रिक साधणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका – निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा नवीन मराठी चित्रपट १ जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. २००१ साली रंगभूमीवर आलेल्या परेश मोकाशी यांच्या ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपट एका वेगळ्या विनोदशैलीत गुंफलेला आहे. यानिमित्ताने, ‘मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाच्या चमूने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली आणि मनमोकळा संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणून चित्रपटाची निवड

मी मध्यंतरी मधुगंधा कुलकर्णीला सांगितले होते की मला वेगळी राजकीय किंवा नकारात्मक भूमिका करायला मिळाल्यास आवडेल. तेव्हा तिने ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट करते आहे, मात्र नकारात्मक नाही, पण वेगळ्या पद्धतीचे पात्र आहे, असे मधुगंधाने सांगितले. तसेच, तुम्ही हिटलरची भूमिका कराल का? असे विचारले. तेव्हा मी हिटलर म्हणून कसा दिसेन? अशी माझ्या मनातील शंका तिला विचारल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले. त्यावर तिने सांगितले की तुमच्यासारखेच मिश्कील पद्धतीचे हे पात्र आहे. तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करून मी हिटलर म्हणून कसा दिसेन हे तिने पाठवले. तेव्हा ते छायाचित्र पाहिल्यानंतर कळले की ही भूमिका वेगळी आहे. तसेच परेश मोकाशींबरोबर मला खूप वर्षांपासून काम करायचेच होते. या सर्व गोष्टी झाल्यानंतर मिशी काढण्याचा एक शेवटचा घाव सर्वांनी माझ्यावर घातला आणि मिशीविना मी कसा दिसतो हे ३०-३२ वर्षांनंतर मी अनुभवलं. नाटक करीत असताना चित्रपटाकडे वळूया असे ठरवले नव्हते, परंतु एक वेगळी भूमिका करायला मिळते आहे, त्यामुळेच ‘मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाची निवड केली. बरोबरीने माझ्या नाटकाचे प्रयोगही सुरूच आहेत. ‘मुंबई – पुणे मुंबई ३’नंतर म्हणजेच जवळपास सात वर्षांनी मी चित्रपटात काम करतो आहे, असे प्रशांत दामले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> फोटोतील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्यांना ओळखलंत का? लवकरच दोघांचा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

सर्व कलाकारांना समान न्याय

‘मु. पो. बोंबिलवाडी’ या नाटकातील विनोद हा कोणत्याही काळात शिळा न होणारा विनोद आहे. १९४२ चा कालखंड, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, जागतिक घडामोडी म्हणजेच दुसरे महायुद्ध आणि गावागावांतील पारावरील नाटकांची चळवळ या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या नाटकात घडामोडींची गुंफण करण्यात आली होती. या नाटकातील विनोद हा ताजा आणि प्रासंगिक असल्यामुळे २४ वर्षांनंतर चित्रपट करत असतानाही तो बदलावासा वाटला नाही. परेश मोकाशी यांच्या चित्रपटातील विनोद हा वेगळा आणि निखळ आहे. या चित्रपटात सर्वांना समान न्याय मिळाला असून सर्वांच्या भूमिका अतिशय छान आहेत. प्रशांत दामले आल्यामुळे चित्रपटाला एक वेगळी लकाकी आली. व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने प्रयोग करणारे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे हे मोठे नाव आहे, त्यामुळे ते चित्रपटाचा भाग असणे खूप महत्त्वाचे आहे. यापूर्वी अनेक उत्तम विनोदी चित्रपट झाले आहेत, पण या चित्रपटाची विनोदशैली ही वेगळी आहे, अशी विनोदशैली तुम्ही कधीही चित्रपटात पाहिलेली नाही, असे मत वैभव मांगले यांनी व्यक्त केले.

नाटकाप्रमाणे चित्रपटाची तालीम

आम्ही ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटासाठी नाटकाप्रमाणे १० ते १२ दिवस फक्त तालीम केली. सर्वप्रथम प्रत्येक प्रसंगाचे चित्रीकरण कसे होणार आहे, हे समजून घेतले. त्यानंतर चित्रीकरणाच्या अनुषंगाने संहिता वाचली आणि तालीम केली. या दरम्यान दिग्दर्शकाकडून बारकावे सांगितले जात होते, तसेच तालीम करताना काही सुधारणा जाणवल्यानंतर बदलही करण्यात आले आणि नवीन गोष्टीही जोडण्यात आल्या, असे वैभव मांगले यांनी सांगितले.

जुना काळ दाखवताना अभ्यास आणि काळजीपूर्वक लक्ष महत्त्वाचे

काळानुसार लेखन व दिग्दर्शनासह विविध गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जुन्या काळातील गाव दाखवताना त्या ठिकाणी आधुनिक वास्तू व इतर गोष्टी दिसल्या नाही पाहिजेत. जुने स्थळ उभे करताना विशेष काळजी घ्यावी लागते. पायवाटा व मातीचे रस्ते असणाऱ्या गावाची निवड करावी लागते. त्या काळातील पाणबुडी व विमाने ही ग्राफिक्सच्या साहाय्याने दाखवावी लागतात. जुन्या काळातील रंग व पोशाख पाहून रंगभूषा आणि वेशभूषा ठरवावी लागते. या सर्व गोष्टी प्रेक्षक बारकाईने पाहतात आणि काही चुका झाल्यास त्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळे जुना काळ दाखवताना अभ्यास आणि विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते, असे परेश मोकाशी-मधुगंधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

समाजमाध्यमांवर वावरताना भान असणे गरजेचे

समाजमाध्यमांवर काय आणि किती लिहावे, या गोष्टीचे युवा पिढीने भान ठेवले पाहिजे. हे माध्यम फुकट असल्यामुळे कोणत्याही गोष्टीवर कसेही भाष्य करणे योग्य नाही. अनेकदा काहीही पूर्वकल्पना व माहिती नसताना, मते मांडली जातात. त्यामुळे थोडासा मोबाइल बाजूला ठेवला पाहिजे आणि रात्रीची जागरणे बंद केली पाहिजेत. दोन ते तीन तास मोबाइलवर रील पाहून काय निष्पन्न होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? त्यामुळे वेळ मिळाल्यास तुम्ही छान ब्लॉग तसेच लेख वाचा. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल, असे मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व भरत शितोळे निर्मित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘हिटलर’ची मुख्य भूमिका साकारली आहे.

तसेच वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमीत पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकारही चित्रपटात झळकत आहेत. तर पटकथा आणि संवाद परेश मोकाशी यांनीच लिहिले आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांचे आहे.

मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे गरजेचे

‘पुष्पा २’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई ही महाराष्ट्रात केली, परंतु या चित्रपटाला दक्षिण भारतात चांगली कमाई करता आली नाही. मराठी प्रेक्षक हे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहत आहेत, मात्र हॉलीवूड, बॉलीवूड, दाक्षिणात्य चित्रपटांच्या गर्दीत मराठी चित्रपटसृष्टी आपले स्थान भक्कम करण्यासाठी आणि आर्थिक यश साधण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी निष्ठेने व अजून जोमाने चित्रपटगृहात सहकुटुंब जाऊन मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत, असे आवाहन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले.

नव्याने कथा रचली….

नाटकावर बेतलेला चित्रपट करताना आवश्यक असलेले सर्व बदल केले, मात्र कथेचा बाज तोच ठेवला आहे. कथावस्तू आणि पात्रेही तीच आहेत, परंतु ही कथा नव्याने रचत सुरुवात, मध्य आणि शेवट बदललेला आहे. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना चित्रपट वेगळा भासेल, असे परेश मोकाशी म्हणाले.

शब्दांकन : अभिषेक तेली

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team of marathi film mukkam post bombilwadi visited loksatta office for movie promotion zws