मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते दोघांचाही एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या दोघांची मुख्य भूमिका असलेला आणि थोडा खट्टा-मीठा अशा पद्धतीची प्रेमकथा असलेला चित्रपट येतो आहे म्हटल्यावर साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता दुणावल्याशिवाय राहात नाही. तर या दोघांना एकत्र आणणारा ‘अशी ही जमवाजमवी’ हा अभिनेता लोकेश गुप्ते दिग्दर्शित चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने, ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात दिग्दर्शक लोकेश गुप्तेसह एकत्र जमलेल्या अशोक सराफ, वंदना गुप्ते, चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे-ओमकार कुलकर्णी या चित्रपटाच्या कलाकार मंडळींनी एकंदरीतच या धम्माल ‘जमवाजमवी’मागची गंमत उलगडली.
एका घरातली आजी आणि दुसऱ्या घरातले आजोबा यांची थोडीशी खट्याळ, थोडी हळवी अशी प्रेमकथा ‘अशी ही जमवाजमवी’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी दिली. या चित्रपटाची निर्मिती राजकमल एंटरटेन्मेंटच्या राहुल शांताराम यांनी केली आहे. आयुष्यातील सांजपर्वात प्रेमात पडलेल्या या आजी-आजोबांच्या भूमिकेला अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हेच न्याय देऊ शकतील, हा विश्वास होता आणि त्यांनाही कथा आवडल्याने ही जमवाजमव शक्य झाली, असं लोकेश यांनी सांगितलं. या चित्रपटात एकाच वेळी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासारखे अनुभवी कलाकार आहेत, शिवाय सुनील बर्वे, सुलेखा तळवलकर, मिलिंद फाटक, चैत्राली गुप्ते यांच्याबरोबरीने नवोदित तनिष्का विशे आणि ओमकार कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत, अशी माहिती देतानाच या सगळ्यांबरोबर कामाचा असलेला अनुभव, परिचय यामुळे अत्यंत सहजतेने चित्रीकरण पार पडलं. या कलाकारांमधली सहजता आणि त्यांच्यातलं हे घट्ट रसायन पडद्यावरही तितकंच खुलून आलं आहे, असं लोकेश यांनी सांगितलं.

या चित्रपटात पहिल्यांदाच दिग्गज कलाकारांबरोबर काम करणाऱ्या तनिष्काने अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर काम करण्याचं दडपण वाटत होतं, मात्र लोकेश यांनी केलेलं मार्गदर्शन आणि खुद्द या अनुभवी कलाकारांचं मोकळंढाकळं वागणं यामुळे सहजपणे चित्रीकरण करता आलं, असं सांगितलं. तर फॉलोअर्स काय फारशी ओळख नसतानाही दिग्दर्शक म्हणून लोकेश गुप्ते यांनी ज्या विश्वासाने आमच्याकडून काम करून घेतलं त्याला तोड नाही, असं मत ओमकार कुलकर्णी याने व्यक्त केलं. याआधी लोकेशबरोबर मालिकेतून एकत्र काम केलं असलं, तरी या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या दिग्दर्शनाखाली पहिल्यांदाच काम केलं, त्यामुळे दिग्दर्शक या नात्याने त्याचं वेगळंच रूप अनुभवता आलं, असं चैत्राली गुप्ते यांनी सांगितलं.

चित्रपट घरबसल्या पाहण्याचा संकुचितपणा का?

सध्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वापर योग्य असला तरी चित्रपट पाहण्यासाठी त्याचा दुरुपयोग करू नका. चित्रपट नेहमी मोठ्या पडद्यासाठीच बनवले जातात, तो संकुचित करून मोबाइलवर पाहण्याइतके संकुचित होऊ नका, असं आवाहन वंदना गुप्ते यांनी केलं. दाक्षिणात्य चित्रपटाच्या यशाचं उदाहरण आपण देतो, तिथेही सगळे चित्रपट चांगले नसतात, तरी तिथला प्रेक्षक त्यांच्या भाषेतील चित्रपटावर सर्वाधिक प्रेम करतो, त्यांच्या चित्रपटांना पुजतो. मराठी चित्रपट पाहायला येण्यासाठी मात्र आपल्या प्रेक्षकांना सतत आवाहन करावं लागतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दिग्दर्शकाला स्वातंत्र्य हवं…

‘एखाद्या कलाकाराचे फॉलोअर्स कमी असले तरी त्याचं काम उत्तम आहे, असा विश्वास दिग्दर्शकाला असेल तर निर्मात्यांनी त्याला ती मोकळीक द्यायला हवी. लोकप्रिय कलाकार हवेत की नवीन चांगलं काम करणारे कलाकार हे त्या त्या चित्रपटाच्या कथेनुसार आवश्यक त्या पद्धतीने निवडण्याचं स्वातंत्र्य दिग्दर्शकाला असायला हवं. बाकी एखाद्या कलाकाराचे फॉलोअर्स किती याने फारसा फरक पडत नाही’, असं मत अभिनेता सुनील बर्वे यांनी व्यक्त केलं.

प्रत्यक्ष चित्रपट पाहायला येणारे किती?

‘बदल ही सातत्याने घडत राहणारी प्रक्रिया आहे, तो बदल आपण कशा पद्धतीने स्वीकारतो त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. समजामाध्यमांचा चित्रपटांना फायदा होतो, त्याची माहिती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते, पण म्हणून एखाद्या कलाकाराचे समाजमाध्यमांवर खूप फॉलोअर्स असतील तर त्याचा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरेल असं होत नाही. चित्रपटाची कथा, त्यातले कलाकार चांगले वाटले तर प्रेक्षक निश्चितच चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात’, असा विश्वास लोकेश गुप्ते यांनी व्यक्त केला. शिवाय, एखाद्याचे लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असतील, पण ते सगळेच चित्रपट पाहायला येत नाहीत. त्यामुळे फॉलोअर्सच्या संख्येशी चित्रपटाच्या वा कलाकाराच्या यशाचा संबंध नसतो, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

नाना पाटेकर हातरिक्षा चालवतात तेव्हा…

चाहत्यांचं प्रेम कधी कधी सुखद अनुभव, तर कधी तापदायक प्रकार कसा ठरतो, याचा किस्सा सांगताना पुसदमध्ये एका लाकडाच्या वखारीत विजयाबाई मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकादरम्यान झालेल्या गोंधळाची आठवण अशोक सराफ यांनी सांगितली. ‘लाकडाच्या वखारीत एका चौथऱ्यावर स्टेजसदृश व्यवस्था उभी करत समोर खुर्च्या अशा पद्धतीचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला स्वत: विजयाबाई, मी, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर असे आम्ही कलाकार होतो. कोठीवर घडणारी गोष्ट असल्याने सगळे प्रसंग हे जमिनीवर बसून बोलण्याचे होते, पण त्यामुळे एका सरळ रेषेत खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकांना स्टेजवरचं काही नीट दिसत नव्हतं. हळूहळू प्रेक्षकांमधून उमटलेला नाराजीचा सूर गोंधळात बदलला, पडदा पाडून प्रयोग थांबवण्यात आल्याने प्रेक्षक चिडले. त्यांनी तोडफोड सुरू केली, रंगमंचावर घुसून कलाकारांना गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा नानाने मला तिथून रंगमंचाच्या मागच्या बाजूने बाहेर काढलं आणि पळतच आम्ही जवळचा रस्ता गाठला. तिथे एक हातरिक्षा थांबवली, पण चालक वयस्कर असल्याने नानांनी त्याला आणि मला मागे बसवून स्वत: हातरिक्षा ओढत फर्लांगभरावर असलेल्या गेस्ट हाऊसपर्यंत नेली’, असा किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला.

लोकेश गुप्ते उत्तम संकलक असल्याची माहितीही अशोक सराफ यांनी दिली. चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात जे जे उत्तम चित्रपट संकलक आहेत ते पुढे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय ठरले, असे ते म्हणाले.

आपल्या भाषेतील चित्रपट पाहण्याला अग्रक्रम

‘आपल्याच भाषेतील चित्रपट पाहायचा हा दाक्षिणात्य लोकांचा आग्रह असतो, तिथे इतर कोणी न सांगता लोकांकडून ते जपलं जातं. याचा एक किस्सा आठवतो. काही वर्षांपूर्वी मी बंगळूरुला गेलो होतो. तिथे महात्मा गांधी रोड आहे आणि त्या एका मोठ्या रस्त्यावर ओळीने दहा चित्रपटगृहं आहेत. त्या दहापैकी नऊ चित्रपटगृहांमध्ये कन्नड चित्रपट लागले होते आणि फक्त एका चित्रपटगृहात अमिताभ बच्चन यांचा हिंदी चित्रपट लागला होता. आम्ही कन्नड सोडून दुसरा चित्रपट पाहणार नाही, हा त्यांचा कडवा बाणा मराठी प्रेक्षकांमध्ये दिसत नाही हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे’, असं निरीक्षण अशोक सराफ यांनी नोंदवलं.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे स्टार होणे नाही…

मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ‘स्टार’ कलाकारांचा काळ प्रेक्षकांनी अनुभवला. आजही ते आमच्याबरोबर काम करत आहेत, पण त्यांच्यासारखी ‘स्टार’ म्हणून लोकप्रियता आता अनुभवता येणं अवघड आहे, त्याचं कारण म्हणजे मुळात ‘स्टार’ची व्याख्या बदललेली आहे. मराठीमध्येही कलाकारांपेक्षा तुमचा चित्रपट काय आहे हे महत्त्वाचं मानलं जातं, पण मराठीत एक काळ गाजवणाऱ्या या कलाकारांसारखे ‘स्टार’ पुन्हा होणं नाही, अशी भावना अभिनेता सुनील बर्वे यांनी व्यक्त केली. तर मराठीत ‘स्टार’ वगैरे कल्पना कधीच नव्हत्या, इथे फक्त चित्रपट आवडणं आणि नावडणं या दोनच गोष्टी खऱ्या आहेत, असं अनुभवी मत अशोक सराफ यांनी व्यक्त केलं.