साधारणपणे २५ ते ३० वर्षांची एक पिढी असते. पण आजकाल तंत्रज्ञानाचा वेग पाहता दर पाचेक वर्षांनी पिढी बदलते म्हणे. आधीच्या पिढीच्या जाणिवा-नेणिवा, अनुभवांशी नव्या पिढीचं अनुभवविश्व काहीसं भिन्न असतं. पण सध्या जे किशोरवयीन आहेत, ते प्रगत तंत्रज्ञान युगात जन्माला आलेले ‘जेन झी’चे प्रतिनिधी आहेत. त्यांचे भावविश्व, त्यांच्या जगात ते एकमेकांशी ज्या भाषेत बोलतात त्या संकल्पना काहीशा नाही, खूप भिन्न आहेत, त्या समजून घेता घेता त्यांच्या पालकांना घाम फुटत आहे. या किशोरवयीनांच्या विश्वात डोकावणारी नेटफ्लिक्सवरील अॅडोलेसन्स ही वेबमालिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. किशोरवयीनांची घुसमट आणि त्यांच्या पालकांची घालमेल एकेक पापुद्रा उलगडत अत्यंत सफाईदारपणे या चार भागांच्या मालिकेत चित्रित झाली आहे.
जेमी या १३ वर्षे वयाच्या मुलाभोवती मालिका फिरते. जेमीने त्याच्याहून थोड्या मोठ्या वयाच्या त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या मुलीला चाकूचे वार करून ठार केले. ती ना त्याची खास मैत्रीण होती, ना तिच्याशी त्याचे फार वैर होते. मग त्याने असे का केले, त्याच्या या कृत्याचा त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर काय परिणाम झाला, त्याचा गुन्हा ठोसपणे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना लागणाऱ्या मानसशास्त्रज्ञाच्या रिपोर्टच्या निमित्ताने मानसशास्त्रज्ञाशी त्याचा दीर्घ संवाद आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या शाळेतलं, सहविद्यार्थ्यांचं वर्तन याभोवती हे कथानक फिरतं. ही कथा इंग्लंडमधल्या एका छोट्या शहरात घडते, पण तिथल्या मुलांची, पालकांची, समाजाची मानसिकता, पुरुषी वर्चस्वाच्या पोकळ संकल्पना, लिंगभेद, वर्णभेद, मुलांवरील समाजमाध्यमांचा प्रभावी पगडा, त्यातून निर्माण झालेला गुंता या सर्व समाजाला पोखरणाऱ्या गोष्टी जशाच्या तशा सार्वत्रिक लागू पडतात. म्हणूनच ही मालिका आपल्या मनाचा ठाव घेते.

चारच भागांची ही वेबमालिका आहे. प्रत्येक भाग साधारणपणे ५० ते ६० मिनिटांचा आहे. पहिल्या भागाची सुरुवात एका घरात शिरलेले पोलीस, त्यानंतरचं अटकसत्र याने होते. पोलीस एका खुन्याला अटक करण्यासाठी येतात. पण हा खुनी एक १३ वर्षांचा कोवळा पोरगा असतो. पोलिसांना घाबरून तो पँट ओली करतो. त्याचे आई-वडील, बहीण घाबरतात. पोलीस त्याला पोलीस ठाण्यात नेतात आणि पुढील प्रक्रिया सुरू होते. त्याच्या घरापासूनच एक विचित्र प्रकारचा ताण मालिकेत हळूहळू शिरू लागतो. नेमकं काय घडलंय याबाबत सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांना काहीच कल्पना नसते. त्यांच्या जिवाची तगमग सुरू असते. पण या एपिसोडच्या शेवटी पोलीस सीसीटीव्ही फुटेज दाखवतात आणि त्याच्या वडिलांना धक्का बसतो.

हत्या, हत्येचा तपास असलेली क्राइम थ्रिलर वगैरे कथेची अपेक्षा करणाऱ्यांसाठी ही मालिका नाही. यात पहिल्या एपिसोडपासून गुन्हा उघड झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा तसा थरार, उत्कंठावर्धक ट्विस्ट अँड टर्न मालिकेत नाही. पण जे आहे ते कमाल आहे. या मालिकेचा सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे याची सिनेमाटोग्राफी. वन टेक शॉट म्हणजे पहिल्या फ्रेमपासून त्या संपूर्ण तासाभराच्या एपिसोडच्या अखेरच्या फ्रेमपर्यंत सिंगल टेकमध्ये सर्व प्रसंग चित्रित केले आहेत. एका प्रसंगातून कॅमेरा बेमालूमपणे दुसऱ्या प्रसंगात शिरतो. या मालिकेतला कॅमेरा हा आपल्याला मालिका दाखवत नाही तर तो त्या मालिकेतलाच एक भाग आहे. पात्रांच्या भावविश्वात तो आपल्याला खेचून नेतो. दुसऱ्या एपिसोडच्या अखेरीस एका गाण्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोनने केलेलं चित्रण तर कॅमेऱ्याच्या करामतीचा कळस होता.

वन टेक चित्रणाची परीक्षा दुसऱ्या एपिसोडला होती. दुसरा संपूर्ण एपिसोडमध्ये मुलाच्या शाळेतील चित्रण आहे. तांत्रिकदृष्ट्या शाळेतल्या विविध वर्गांमध्ये फिरणं, मध्येच मॉक ड्रीलसाठी मैदानात आलेले सर्व आणि तेथून जेमीच्या मित्राचा पळण्याचा प्रयत्न हे सर्व प्रसंग एका टेकमध्ये चित्रित होताना पाहून आपण केवळ थक्क होतो.

ओवेन कूपर या १५ वर्षांच्या मुलाने मालिकेतल्या १३ वर्षीय जेमी मिलरचं पात्र साकारलं आहे. मालिकेतील एकाच टेकमधील संपूर्ण चित्रणाचे आव्हान अन्य मोठ्या, अनुभवी अभिनेत्यांनी पेलवलं हे समजू शकतो. पण या मुलाने तिसऱ्या भागात संपूर्ण तासाभराचा वन टेक प्रसंग, संवाद, अभिनयातील चढउतारांसह अप्रतिम साकारला आहे. या मुलाची ही पहिलीच मालिका आहे, हे समजल्यावर तर आपण स्तिमित होतो.

मालिका तांत्रिक अंगाने, अभिनयदृष्ट्या उत्कृष्ट आहेच. पण त्याच्या कथेवर केलेलं काम काय उंचीचं असू शकेल हे शेवटच्या भागात जाणवतं. एखाद्या कुटुंबातल्या मुलानं गुन्हा केला असेल तर समाज त्या कुटुंबालाही दोषी ठरवतो. मुलगा तुरुंगात असला तरी कुटुंबही तितकीच क्रूर शिक्षा भोगतं. वडिलांच्या वाढदिवसाला मुलगा तुरुंगातून शुभेच्छापत्र पाठवतो, त्याने वडिलांचं चित्र रेखाटलेलं असतं. फुटबॉल ग्राऊंडपेक्षा रंगांच्या दुनियेत रमणारा आपला मुलगा असं कसं वागला, आपण कुठे कमी पडलो, आपली मुलगी तर निकोप वाढत आहे, तिची समजही चांगली आहे, दोन्ही मुलांना आपणच वाढवलं तर दोघांत इतका फरक कसा, आपण खरंच आपल्या मुलाला ओळखत होतो का हे त्याच्या आई-वडिलांना पडलेले प्रश्न आणि त्यातून त्यांच्या जिवाची होणारी घालमेल या संपूर्ण चौथ्या भागावर पसरून राहिली आहे.

स्टीफन ग्रॅहॅम या अभिनेत्याने जेमीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. प्लबिंगची कामं करणारा, एक सरळसाधं आयुष्य जगणारा हा पिता मुलाच्या कृत्यानंतर कोसळून जातो. हे हाय खाणं एका दिवसात होत नाही. आधी मुलामागे खंबीरपणे उभं राहणं, दुसरीकडे स्वत:ला आणि कुटुंबाला हळूहळू सावरणं, तरी जगू न देणाऱ्या समाजाच्या निष्ठुरतेनं उद्विग्न होणं हे भावनिक चढउतार स्टीफन ग्रॅहॅमने अप्रतिम साकारले आहेत. स्टीफन हाच मालिकेच्या क्रिएटर आणि लेखकद्वयींपैकी एक आहे. जेमीच्या या असहाय बापाचा संपूर्ण कथेभर दाबून ठेवलेल्या वेदनेचा हुंकार अखेर हमसून हमसून रडत अश्रूंच्या रूपात बाहेर येतो तेव्हा आपलेही डोळे पाणावलेले असतात.

मालिकेच्या शेवटापर्यंत आपण स्तब्ध होतो. ही पात्रे अभिनय करत आहेत, हे काही काळानंतर आपण विसरून जातो. आपण त्यांच्याबरोबर तिथे वावरत असतो. प्रत्येक न उच्चारलेला शब्द, भावना आपण जगत असतो. यातले पालकांचे प्रश्न आपलंही काळीज पिळवटून टाकतात. मुलांच्या वेदनांनी आपल्यालाही जखमा होतात. कथेतून विचारलेले, न विचारलेले प्रश्न सीरिज संपल्यावर आपल्या मनाचा ताबा घेतात. कोणताही आकांडतांडव, भावनिक अतिरेक न दाखवताही जो साधायचा तो परिणाम मालिकेने उत्तम साधला आहे. तुम्ही पालक असा, नसा ही वेबमालिका एकदातरी पाहावी अशीच आहे.

यू ट्यूबवर असणारा तिच्या मेकिंगचा व्हिडीओ पाहणे हादेखील सुखद अनुभव आहे.

अॅडोलेसन्स

ओटीटी – नेटफ्लिक्स

लेखक – स्टीफन ग्रॅहॅम, जॅक थॉर्न

दिग्दर्शक – फिलीप बरांतिनी