नुकतीच जिया खान या तरूण अभिनेत्रीने आत्महत्या केली, ती आत्महत्या का खून आहे हे वादातीत आहे. त्या अगोदर दिव्या भारती, सिल्क स्मिता, जुन्या अभिनेत्री मध्ये विमी या अभिनेत्री आत्महत्या केल्या होत्या, की येवढी प्रसिद्धी, पैसा असून सुध्दा या अभिनेत्रीनी आत्महत्या का केली असेल? तसेच मीना कुमारी, परवीन बाबी, मराठी मध्ये रंजना अशा अनेक अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोकात असताना ही जीवनात त्यांना आलेले नैराश्य का आले असेल? हिंदी मध्ये सिल्क स्मिताच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती झाली, तसेच या हिंदी, मराठी चित्रपटात काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री स्ट्रगल करीत असतात. काम मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते, कास्टींग काऊचच्या नावाखाली त्यांची गळचेपी होत असते. निर्मातेद्वयी गिरीश भदाणे व नीता देवकर यांनी निर्मिती केलेल्या अशाच एका अभिनेत्रीच्या खाजगी जीवनाचा प्रवास दर्शवणारा सुर्यतेज प्रोडाक्शनच्या बॅनरखाली ‘नटी’ या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच मुंबई, पुणे व भोर येथे पूर्ण झाले. योगेश जाधव या तरूण दिग्दर्शकाने या ‘नटी’चे दिग्दर्शन केले आहे.
‘नटी’ या सत्य परिस्थिती व या चित्रसृष्टीतील होणाऱया घडामोडीवर आधारीत चित्रपटाची कथा नीता देवकर यांची असून पटकथा व संवाद दिग्दर्शक योगेश जाधव यांनी लिहीले आहेत. रोहीत साळवी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहीले आहे. निखिल महामुनी या नविन ताज्या दमाच्या संगीतकाराने प्रथमच या चित्रपटाला संगीत दिले आहे. त्याच्या या पहील्याच प्रयत्नात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले त्याचप्रमाणे जावेद अली, अभिजीत सावंत व डॉ. नेहा राजपाल यांनी आवाज दिला आहे. ही ‘नटी’तेजा देवकर या अभिनेत्रीने साकारली असून सुबोध भावे, अजिंक्य देव, नागेश भोसले, किशोरी शहाणे आणि किशोर कदम या कसलेल्या अभिनेत्यांनी भूमिका साकारल्या आहेत.