अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजे कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊलींच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा येत्या १८ एप्रिलपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. या चित्रपटात संत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अभिनेता तेजस बर्वे याने केली असून नेहा नाईक हा युवा चेहरा मुक्ताईच्या भूमिकेत झळकणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची जनमानसाच्या काळजात घर करणारी भूमिका या चित्रपटात तेजस बर्वे हा गुणी कलाकार साकारणार आहे. मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी असलेला तेजस गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. केवळ माऊलींसारखे दिसणेच नव्हे तर माऊलींचे असणेही वाटावे यासाठी, या दृष्टीने तेजसने प्रचंड अभ्यास आणि मेहनत केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हृद्या भावाबहिणीचे नाते ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे.

तर या चित्रपटात मुक्ताईची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा नाईक ही पुण्यामध्ये रंगभूमीवर अतिशय उत्तमरीत्या कार्यरत आहे.

एका वेगळ्या विषयावर तितक्याच ताकदीची भूमिका साकारताना नेहाने आपल्या देहबोलीबरोबरच तीन महिने वाणी संस्काराचे खास प्रशिक्षण पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडे घेतले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्यायोगे जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही १३ व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाने अभ्यासले. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, ‘या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळवायला हवं. म्हणून मी त्यातल्या भाषेच्या अभ्यासावर भर दिला. प्रा. श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालमी चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे धडे दिग्पाल लांजेकर यांनी दिले. या चित्रपटात मृणाल कुलकर्णींसारख्या अनुभवी कलाकारांना काम करताना पाहणं हाही माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता.’

Story img Loader