छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील शुभ्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. शुभ्रा ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकरली होती. आता ही शुभ्रा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजश्रीसोबत अभिनेता अभिजीत खांडकेकर देखील दिसत आहे. ते दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत.
या भाऊबीजेला भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणारा लघुपट ‘कशा असतात ह्या बायका’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजश्री आणि अभिजीत या लघूपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. ‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित आहे. हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर पाहायला मिळेल.
या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे, ती म्हणजे अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी भाऊबीज या थीमवर हा लघुपट असला तरी कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.