झी मराठी या वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेमुळे तेजश्री प्रकाश झोतात आली. परंतु या मालिकेने नंतर तेजश्री छोट्या पडद्यापासून लांब होती. आता तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच ‘अग्गंबाई सासूबाई..’ या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या मालिकेचा प्रमो प्रदर्शित केला आहे. मालिकेच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला एक लग्नसोहळा दाखवण्यात आला आहे. दरम्यान तेजश्री एका विवाहित महिलेच्या रुपात सुंदर दिसत आहे. हा लग्नसोहळा तेजश्रीच्या सासूबाईंचा असतो. झी मराठीने हा ट्रेलर प्रदर्शित करताना ‘लग्न सासूचं….करवली सुनबाई, अग्गंबाई सासूबाई..!!’ असे त्यांनी कॅप्शन दिले आहे. या मालिकेत तेजश्री जान्हवी प्रमाणेच आदर्श सूनेच्या भूमिकेत दिसणार की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
दरम्यान तेजश्रीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या मालिकेबद्दल माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’ या फिचरद्वारे ‘अग्गंबाई सासूबाई’ असे लिहित स्टोरी पोस्ट केली. तिच्या या स्टोरीवर अनेक चाहत्यांनी तेजश्री पुन्हा एकदा मालिकेत दिसणार म्हणून आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे चाहत्यांनी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्रीने चाहत्यांचे स्क्रिन शॉट तिच्या स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत.
तेजश्रीने तिच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील एक फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तेजश्री पिवळ्या रंगाची साडी नेसली असून तिने केसात गजरा माळला आहे. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आता चाहत्यांची मालिकेबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत तेजश्रीसह आणखी कोण दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.